मुश्रीफ यांच्या तराटणीनंतर आशांचे कार्यमुक्तीचे पत्र रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:19+5:302020-12-08T04:21:19+5:30
कोल्हापूर : आशा वर्कसनी क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला नाही तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा इशारा देणारे पत्र सोमवारी ...
कोल्हापूर : आशा वर्कसनी क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला नाही तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा इशारा देणारे पत्र सोमवारी संध्याकाळी जिल्हा परिषदेने रद्द केले. जिल्हा आशा वर्कस व गटप्रवर्तक युनियनने हे पत्र रद्द करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी दुपारी जिल्हा परिषदेसमोर सात तास रास्ता रोको केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन प्रश्न सोडविण्याची तराटणी दिली.
दुपारनंतर काही आशा कर्मचारी उठून गेल्या. मात्र, सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी लेखी पत्र दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. अखेर मुख्य कार्यकारी अमन मित्तल यांनी संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सायंकाळी साडेसहा वाजता लेखी पत्र रस्त्यावर येऊन दिले. सर्व देणी तातडीने देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
आधीचेच मानधन मिळालेले नसल्याने क्षयरोग, कुष्ठरोग सर्वेक्षणावर आशा वर्कस आणि गटप्रवर्तक यांनी बहिष्कार घातला होता. जि. प. समोर आंदोलन करण्याची घोषणाही केली होती. त्यानुसार दुपारी १२ पासूनच जिल्ह्यातून आशा वकर्स, गटप्रवर्तक मोठ्या संख्येने जमू लागल्या. सर्वांनी रस्त्यावर ठिय्या मारला. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी जि. प. च्या आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृहावर बोलावून घेतले. तेथे चर्चा झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मोर्चासमोर येऊन झालेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर कार्यमुक्तीचे पत्र रद्द करण्यात आले आहे.
महिला आणि बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांच्यासह चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, सारिका पाटील, उज्वला पाटील, संगीता पाटील यांची भाषणे झाली.
चौकट
तुमचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचे यावेळचे भाषण लक्षवेधी झाले. ते म्हणाले, सगळ्याच मागण्या एकाच दिवशी पूर्ण होणार नाहीत. पण शक्य आहे तेवढे सर्व आम्ही करणार आहोत. तुम्ही आमच्या आई, बहिणीसारख्या आहात. तुमचे दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.
चौकट
मला कारणे नकोत...
प्रत्येक जिल्ह्यात काेणालाच मानधन मिळाले नसताना कोल्हापुरातच मोर्चा कसा निघतो, असे स्पष्टीकरण अमन मित्तल यांनी मुश्रीफ यांच्याशी बोलताना दिले तेव्हा मुश्रीफ यांनी ही लोकशाही आहे. येथे कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. बाकी काही न सांगता यांची देणी तातडीने द्या असे मित्तल यांना सुनावले.
०७१२२०२० कोल झेडपी ०१
कोल्हापुरात सोमवारी विविध मागण्यांसाठी आशा वर्कस आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. (छाया : नसीर अत्तार)