UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:54 AM2022-05-31T11:54:44+5:302022-05-31T12:08:01+5:30
चांगल्या नोकरीची संधी असूनसुद्धा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दिल्लीमध्ये एक वर्ष अभ्यास केल्यानंतर कोरोनाकाळात दोन वर्षे घरी अभ्यास केला व दुसऱ्या प्रयत्नात आशिष हे यूपीएससी परीक्षा पास झाले.
बांबवडे : साळशी (ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक शिक्षक अशोक पाटील यांचा मुलगा आशिष यांनी भारतीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात ५६३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. त्यांनी हे यश दुसऱ्याच प्रयत्नात प्राप्त केले आहे. आशिष पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच पूर्ण झाले आहे.
त्यांचे वडील सावे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, ते उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. आशिष यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथे पूर्ण झाले. त्यांनी दहावीच्या बोर्डात ९७ टक्के गुण प्राप्त केले होते. पुढे अकरावी आणि बारावी पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये पूर्ण केले. या काळात भारत सरकारद्वारे दिली जाणारी नॅशनल टॅलेंट सर्च शिष्यवृत्ती त्यांनी प्राप्त केली होती. ही शिष्यवृत्ती प्राप्त करणारे तालुक्यातील ते एकमेव विद्यार्थी आहेत.
त्यांनी पुढे पुणे येथीलच सीओईपी कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिकं, टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. यानंतर चांगल्या नोकरीची संधी असूनसुद्धा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दिल्लीमध्ये एक वर्ष अभ्यास केल्यानंतर कोरोनाकाळात दोन वर्षे घरी अभ्यास केला व दुसऱ्या प्रयत्नात आशिष हे यूपीएससी परीक्षा पास झाले.