आशिष रावराणे जगातील साहसी डकार रॅलीमध्ये उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:25 AM2021-01-03T04:25:15+5:302021-01-03T04:25:15+5:30
कोल्हापूर : मोटारसायकलपटूंकरिता जगातील सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या डकार रॅलीसाठी एकमेव खासगी मोटारसायकलपटू म्हणून कोल्हापूरच्या आशिष रावराणे याची ...
कोल्हापूर : मोटारसायकलपटूंकरिता जगातील सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या डकार रॅलीसाठी एकमेव खासगी मोटारसायकलपटू म्हणून कोल्हापूरच्या आशिष रावराणे याची निवड झाली आहे. आज, रविवारपासून या स्पर्धेस सुरुवात होणार असून, सहभागी मोटारसायकलपटूंना बारा दिवसांत ७२४७ किलोमीटरचे अंतर पार करायचे आहे. तो छत्रपती शाहू विद्यालय व विवेकानंद काॅलेजचा माजी विद्यार्थी असून, ज्येष्ठ क्रिकेटपटू उदय रावराणे यांचा मुलगा आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीवर आशिषची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत बहुतांशी स्पर्धक कंपनी स्पर्धक म्हणून सहभागी होतात. मात्र, आशिष हा एकमेव भारतीय असून, त्याने कामगिरीच्या जोरावर खासगी मोटारसायकलपटू म्हणून स्पर्धेत सहभाग मिळवला आहे. तो मर्चंट नेव्हीमध्ये मरिन अभियंता आहे. या स्पर्धेत सरासरी ६०० किलोमीटरचे अंतर रोज पार करावे लागणार आहे. बारा दिवसांत त्याला एकूण ७२४७ किलोमीटर अंतर पार करावे लागणार आहे. वाळवंट, खडकाळ कच्चा रस्ता, अतिउष्णता, अतिथंडीचा सामना स्पर्धकांना करावा लागणार आहे. स्पर्धेत ११२ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. तो केटीएम ४५० ही मोटारसायकल चालविणार असून, सध्या स्पेनमध्ये सराव करीत आहे.
फोटो : ०२०१२०२१-कोल-आशिष रावराणे