साताऱ्यातील अशोक थोरवेंच्या खुनाचे रहस्य ५ वर्षांनंतर उलगडले
By Admin | Published: April 14, 2017 11:05 PM2017-04-14T23:05:15+5:302017-04-14T23:05:15+5:30
पत्नीच मारेकरी : विवाहबाह्य संबंधातून कृत्य
अहमदनगर : मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात एप्रिल २०१६ मध्ये एक बँक अधिकारी मिसिंग झाल्याची तक्रार दाखल होते़ पुढे या तक्रारीच्या माध्यमातून झालेल्या पोलीस तपासात रहस्यमयरित्या गायब झालेल्या दोघा जणांच्या खुनाला वाचा फुटते़ गूढ चित्रपटाच्या कथानकाला साजेशा अशा हत्याकांडाच्या घटनाक्रमाची मुंबईच्या विशेष पोलीस पथकाने उकल केली आहे़ यात हत्याकांडात साताऱ्यातील अशोक थोरवेच्या खुनाचा पाच वर्षांनंतर उलगडा झाला आहे.
मुंबईतील चारकोप परिसरात राहणाऱ्या आशा वानखेडे हिने एप्रिल २०१६ मध्ये पती प्रकाश वानखेडे मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली होती़ पोलीस तपासात मात्र प्रकाश यांचा शोध लागला नाही़ पुढे परिमंडळ ११ चे उपायुक्त विक्रम देशमाने यांनी पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला़
आशा हिने मिसिंग तक्रार देण्याच्या आधी प्रकाश आणि आशा हे दोघे नगर येथे होते अशी माहिती समोर आली़ पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता आशा हिने दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आली़
त्यामुळे पोलिसांचा आशा हिच्यावर संशय बळावला़ पोलिसांनी आशा हिची कुंडली काढली. तिची कसून चौकशी केली तेव्हा आशा हिने प्रकाश यांचा नगर येथे विवाहित बहीण वंदना थोरवे व तिचा प्रियकर निलेश सुपेकर यांच्या मदतीने खून केला़ तसेच मृतदेह पारनेर तालुक्यातील भाळवणी गावाजवळ फेकून दिल्याची कबुली दिली़
चारकोप पोलिसांनी आशा, वंदना व निलेश यांना अटक केली़ दरम्यान एक वर्षापूर्वी पारनेर पोलिसांना भाळवणीजवळ एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता़ या मृतदेहाची ओळख न पटल्याने पारनेर पोलिसांचा तपास थंडावला होता़ मात्र हा मृतदेह प्रकाश वानखेडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, सध्या ते पोलीस कोठडीत आहेत़ (प्रतिनिधी)
मिसिंग तक्रारीने उलगडले दोन खुनाचे रहस्य
प्रकाश वानखेडे यांच्या खुनाचा तपास करत असताना मुंबई पोलिसांनी वंदना हिच्याबाबतही माहिती काढली तेव्हा तिचा पती अशोक थोरवे हा पाच वर्षांपासून गायब असल्याचे समोर आले़
मूळचे साताऱ्याचे असलेले थोरवे नगरमध्ये स्थायिक झालेले होते़ बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलिसांना नोव्हेंबर २०१२ मध्ये एक अनोळखी मृतदेह आढळूला होता़ पोलिसांनी त्याचे फोटो सातारच्या थोरवे कुटुंबीयांना दाखविल्यानंतर त्यांनी अशोक थोरवे असल्याचे सांगितले़
त्यानंतर पारनेर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या वंदना हिला पोलिसी खाक्या दाखविताच ती पोपटासारखी बोलू लागली़ वंदना आणि निलेश यांच्या प्रेमसंबंधात अशोक अडथळा ठरत होता़
१२ नोव्हेंबर २०१२ मध्य अशोक याला जेवणातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले़ त्यानंतर प्रियकर निलेश याच्या मदतीने त्याचा खून करून चेहरा दगडाने ठेचून मृतदेह अंभोरा परिसरात फेकून दिला, अशी कबुली वंदना हिने दिली आहे़
‘अशोक याला एचआयव्ही होता़ त्यामुळे मलाही आजार झाला म्हणून मी त्याचा खून केला’ असेही वंदना हिने पोलिसांना सांगितले़