अशोकअण्णांची ‘गुगली’, इच्छुकना ‘धडकी’
By Admin | Published: April 13, 2016 12:00 AM2016-04-13T00:00:15+5:302016-04-13T00:15:04+5:30
आजरा कारखाना : आघाड्यांचे चित्र अस्पष्ट; नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचाही विचार
ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा --रविवारच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली, परंतु त्याचबरोबर मुश्रीफ यांच्यासारखी कामे करणारा जिल्ह्यात दुसरा नेता नाही. जिल्हा बँक कारभारात तर त्यांचे योगदान अभिनंदनीय आहे, असे जाहीर गौरवोद्गार काढल्याने सत्तारूढ राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस विरोधात अशोकअण्णा आघाडी उभारणार आणि त्यातून आपणाला उमेदवारी मिळणार, अशी अटकळ असणाऱ्या इच्छुकांना मात्र अशोकअण्णांच्या गुगलीने धडकी भरली आहे.
आजरा साखर कारखान्याची पक्की मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. २२ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. अद्याप आघाड्यांचे कोणतेच चित्र स्पष्ट नाही. वातावरणनिर्मितीत अशोकअण्णा चराटी यांनी आघाडी घेतली आहे. अशोकअण्णांची आक्रमक भूमिका पाहून अनेक मंडळींनी त्यांच्या आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत.
शिवसेना, स्वाभिमानी, रवींद्र आपटे यांचा गट अशोकअण्णांसोबत राहणार हेही स्पष्ट आहे. अशोकअण्णांच्या भूमिकेवर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.
कोणत्याही परिस्थितीत अशोकअण्णा स्वतंत्र आघाडी उभारणारच असे गृहीत धरून इच्छुकांनी आपल्या जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे; पण अशोकअण्णांनीच ‘सावध’ चाचपणी सुरू करून उतावीळपणा न करता राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत आपण कोणताही निर्णय घेऊ शकतो, असे सांगून ‘इच्छुकांनाही’ सावध केले आहे. केवळ साखर कारखाना निवडणूक एवढाच मुद्दा अजेंड्यावर ठेवून चालणार नाही, तर होऊ घातलेल्या नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांचाही विचार करून पावले टाकावी लागणार याची पूर्ण जाणीव असल्याने भडक विधान केले जाणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली आहे.
अशोकअण्णा आणि जयवंतराव शिंपी एकत्र येणार अशी कार्यकर्त्यांची चर्चा असली, तरी जयवंतराव शिंपी यांनी याबाबत कुठेही उघड वाच्यता न करता भलेही राष्ट्रवादीच्या कामकाजावर टीका केली असली, तरी ते राष्ट्रवादीच्या प्रवाहात असल्याने ही केवळ चर्चाच ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जयवंतराव आणि अशोकअण्णा एकत्र येतीलच, असे ठामपणे म्हणणे चुकीचे आहे.
इच्छुकांची धावपळ
तालुक्याच्या राजकीय पटलावर सगळेच गोंधळाचे वातावरण आहे. मुकुंददादा देसाई, उदय पवार, सुधीर देसाई यांनी अद्याप मौन बाळगले आहे. विष्णुपंतांनी आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असे जाहीर केले आहे. अंजनाताई रेडेकर यांनी आमदार सतेज पाटील घेतील त्या निर्णयास बांधील राहण्याचे ठरवल्याने इच्छुकांची मात्र चांगलीच धावपळ होऊ लागली आहे.
सत्तारूढ एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न
सत्तारूढ मंडळी एकत्र राहिल्यास विद्यमान संचालकांमधील अनेक पत्ते कट होणार आहेत, तर बहुतांशी इच्छुक राजकीयदृष्ट्या ‘निराधार’ होणार असल्याने अनेक कार्यकर्ते उलटसुलट विधाने करून सत्तारूढ एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत.