अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपपत्रात आठ कलमांची वाढ, बिद्रे-गोरे कुटुंबीयांकडून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:55 AM2019-06-25T10:55:52+5:302019-06-25T10:57:46+5:30
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी अलिबाग न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेल्या युक्तीवादामुळे आरोपपत्रात वाढीव आठ कलमांचा समावेश केला गेला. त्यातील ‘१२० ब’ कलमानुसार सर्वच आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे सिद्ध होऊन शिक्षा लागण्याची शक्यता आहे. वाढीव कलमांमुळे बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी अलिबाग न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेल्या युक्तीवादामुळे आरोपपत्रात वाढीव आठ कलमांचा समावेश केला गेला. त्यातील ‘१२० ब’ कलमानुसार सर्वच आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे सिद्ध होऊन शिक्षा लागण्याची शक्यता आहे. वाढीव कलमांमुळे बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
बिद्रे हत्या प्रकरणाची अलिबाग न्यायालयात न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली आहे. सोमवारी विशेष सरकारी वकील अॅड. घरत यांनी वाढीव कलमासंदर्भात युक्तीवाद केला. त्यांनी सुचविल्यामुळे १२० ब नुसार आठ कलमे वाढविण्यात आली. यामुळे आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा मित्र राजेश पाटील, फळणीकर, भंडारी अशा चौघांनी संघटित होऊन कट रचणे, खोटे पुरावे तयार करणे, पोलिसांची दिशाभूल करून तपासात अडथळे निर्माण करणे, आदी आरोपांची कलमे लावली आहेत; त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा पुरावे नष्ट करणाऱ्यांना लागणार आहेत.
अभय कुरुंदकरने जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. त्याचे वरिष्ठ वकील हजर नसल्याने त्यावर ४ जुलैला सुनावणी ठेवण्यात आली. यावेळी न्यायालयात कुरुंदकरसह सर्व संशयित न्यायालयात उपस्थित होते.
बिद्रे हत्याकांडात नवी मुंबई पोलिसांनी १२० ब हे कलम व इतर महत्त्वाची कलमे लावली नव्हती. त्याचा फायदा आरोपींना होण्याची दाट शक्यता होती; परंतु सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये अन्य आठ कलमे वाढविल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. सर्वच आरोपींना एकच शिक्षा होईल, अशी आशा आहे.
- राजकुमार गोरे,
मृत अश्विनी बिद्रेचे पती