अश्विनी बिद्रे हत्याकांड साक्षीदारांच्या उलट तपासणी, पुढील सुनावणी १९ डिसेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:04 PM2019-12-07T16:04:07+5:302019-12-07T16:05:38+5:30
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्यासमोर सुरू आहे. शुक्रवारी साक्षीदार व फिर्यादी आनंद बिद्रे यांची उलट तपासणी पूर्ण होणार होती; परंतु आरोपीचे वकील भानूशाली अनुपस्थित राहिल्याने १९ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्यासमोर सुरू आहे. शुक्रवारी साक्षीदार व फिर्यादी आनंद बिद्रे यांची उलट तपासणी पूर्ण होणार होती; परंतु आरोपीचे वकील भानूशाली अनुपस्थित राहिल्याने १९ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
दोन महिन्यांपासून या खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. फिर्यादी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत काम पाहत आहेत. मागील दोन सुनावणीत अश्विनी बिद्रे यांचा भाऊ आनंद बिद्रे यांची साक्ष झाली. सरकारी वकिलांनी ही साक्ष नोंदवून घेतली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणीला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी उलट तपासणी पूर्ण होणार होती; परंतु आरोपीचे वकील हजर नव्हते. यावेळी सरकारी वकील अॅड. घरत यांनी साक्षीदार आनंद बिद्रे हे चेन्नई येथून साक्ष देण्यासाठी पनवेलला येतात, त्यांना दंड व प्रवासखर्च देण्यात यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली.
न्यायालयाने ती मागणी मान्य करून आनंद बिद्रे यांना ८ हजार रुपये प्रवासखर्च देण्याचे आदेश केले. यावेळी तत्कालीन तपास अधिकारी संगीता शिंदे-अल्फान्सो, अजय कदम, अश्विनी यांचे पती राजकुमार गोरे उपस्थित होते.