भाषण करायला सांगा, ‘एन. डी.’ बरे होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:55 AM2019-09-23T00:55:44+5:302019-09-23T00:55:48+5:30
कोल्हापूर : कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ ...
कोल्हापूर : कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करताना ‘त्यांना भाषण करायला सांगा, ते लगेच बरे होतील’, अशी सूचना मिश्किलपणे पवार यांनी मोठी बहीण सरोज (माई) पाटील यांना केली.
शरीरातील प्लेटलेटस् कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून प्रा. पाटील हे कदमवाडी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार हे साताराहून रविवारी रात्री आठच्या सुमारास कोल्हापूरमध्ये आले. ते थेट रुग्णालयात गेले. पवार हे प्रकृतीची चौकशी करत असतानाच, ‘दलबदलूंना पाडण्यासाठी महाराष्ट्रभर मी फिरणार आहे; त्यामुळे मी तसा सहजासहजी आजारी पडणार नसल्याचे’, प्रा. पाटील यांना सांगितले. त्यावर ‘लढाई करणे ही त्यांची ऊर्जा आहे; त्यामुळे त्यांना भाषण करायला लावा’, ते लगेच बरे होतील’, असा सल्ला पवार यांनी देताच उपस्थितांमध्ये हास्य फुलले. अर्धा तास पवार हे रुग्णालयात थांबले होते. तेथून ते मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्यासमवेत उद्योजक व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, सुनील देसाई, आदी होते.
सरकारबद्दल जनतेत प्रचंड चीड
साताऱ्यातील तुमच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे समजले, असे प्रा. पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यावर पवार यांनी सांगितले की, साताºयाबरोबरच उस्मानाबाद, मराठवाडा येथील सभांनादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आपल्यापासून काहीसा दुरावलेला युवावर्ग पुन्हा पक्षाकडे येत आहे. भाजप सरकारबद्दल जनतेत प्रचंड चीड आहे. राष्ट्रवादी घेत असलेल्या सभांच्या माध्यमातून त्याची प्रचिती येत आहे.