किरवले यांची हत्या साठ लाख जादा मागितल्याने

By admin | Published: March 7, 2017 12:45 AM2017-03-07T00:45:12+5:302017-03-07T00:45:12+5:30

तपासात उघड : कोयता व रक्ताने माखलेली पँट जप्त

By asking for more than six lakhs of Kirwala's assassination | किरवले यांची हत्या साठ लाख जादा मागितल्याने

किरवले यांची हत्या साठ लाख जादा मागितल्याने

Next



कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. राजेंद्रनगर) यांनी बंगल्याच्या ठरलेल्या व्यवहारात ६० लाख रुपये वाढवून मागितले होते. त्यातून संशयित प्रीतम पाटील व त्यांच्यात वादावादी झाली. किरवले यांनी रक्कम वाढवून दिली तरच मी रजिस्ट्रेशन करणार, अन्यथा तुला पैसे आणि बंगलाही देत नाही, तुला काय करायचे ते कर, असा दम दिला होता. या रागातून त्याने डॉ. किरवले यांची हत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
दरम्यान, हत्या करण्यासाठी वापरलेला कोयता व आरोपी प्रीतम पाटील याची रक्ताने माखलेली पँट पोलिसांनी सोमवारी जप्त केली. प्रतिभानगर येथील नाल्यात टाकलेले साहित्य आरोपी मंगला गणपती पाटील हिने स्वत:हून्काढून दिले. रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा पाहून नागरिकांनी गर्दी केली होती. डॉ. किरवले यांच्या हत्येनंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांच्यात संताप आहे. घटनास्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
डॉ. किरवले यांचा बंगल्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून खून केल्याची कबुली संशयित प्रीतम गणपती पाटील (३०, रा. राजेंद्रनगर) याने दिली आहे. आरोपीने दिलेल्या कबुलीची पोलिसांनी खातरजमा केली असता डॉ. किरवले व त्याच्यात व्यवहार झाल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संशयित पाटील याच्या घरातून बंगल्याच्या व्यवहाराचा दस्त (संचकारपत्र) सोमवारी जप्त केले. डॉ. किरवले व संशयित प्रीतम पाटील यांच्यात ४६ लाख किमतीला बंगल्याचा व्यवहार झाला. पाटील याने नातेवाईक, मित्रांकडून हातऊसने पैसे घेऊन वेळोवेळी असे २६ लाख रुपये किरवले यांना दिले. उर्वरित २० लाख रुपये रजिस्टेशन करतेवेळी द्यायचे होते. त्यासाठी तो आपले जुने घर विकून किरवले यांना पैसे देणार होता. मात्र, किरवले यांनी सध्याच्या बाजारभावाप्रमाणे बंगल्याची किमत दीड कोटी होते. ठरलेल्या व्यवहारामध्ये आणखी ६० लाख रुपये वाढवून दे,असा तगादा लावला. त्यातून त्यांच्यात वादावादी होत होती. किरवले यांना रोख स्वरुपात २६ लाख रुपये दिलेला कागदोपत्री पुरावा पाटील याच्याकडे नव्हता. त्यामुळे त्याने गोड बोलून तुमची वाढीव रक्कम मी देतो, असे बोलून किरवले यांच्याकडून पहिल्या ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे दि. ३ मार्चला संचकारपत्र करून घेतले. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर संशयित प्रीतमने मी वाढीव रक्कम तुम्हाला देणार नाही. जो पहिला व्यवहार झाला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला २० लाख रुपये मी देणे लागतो, असे सांगितले. त्यावर किरवले यांनी ‘६० लाख रुपये वाढवून दिलेस तरच मी रजिस्टेशन करणार, अन्यथा तुला पैसे आणि बंगलाही देत नाही, तुला काय करायचे ते कर,’ असा दम दिला. किरवलेंच्या या स्वभावामुळे संशयित प्रीतम सैरभैर झाला. राग अनावर झाल्याने किरवलेना संपविण्याच्या उद्देशाने तो दुचाकीवरून शाहूपुरी गोकुळ हॉटेल परिसरात आला. येथील शेती-औजारे दुकानातून कोयता खरेदी केला तेथून तो थेट किरवलेच्या घरी गेला. यावेळी पुन्हा बंगल्याच्या व्यवहाराचा विषय काढला. किरवले त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्याने हल्ला केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
दरम्यान, खुनानंतर रक्ताने माखलेला कोयता व पँट त्याची आई मंगला पाटील हिने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरापासून काही अंतरावर असलेल्या प्रतिभानगर येथील नाल्यात फेकून दिली होती. ती जप्त करण्यासाठी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके, बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक स्मिता काळभोर आदी अधिकाऱ्यांसह चार-पाच गाड्यांचा ताफा दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रतिभानगर येथील पुलावर आला. त्यांच्यासोबत संशयित मंगला पाटील होती. तिने गाडीतून खाली उतरून पुलावरून कोयता व पँट टाकलेली जागा दाखविली. नाल्यात कमी पाणी असल्याने पँट दिसत होती. ती बाहेर काढली असता त्यामध्ये गुंडाळून ठेवलेला कोयता मिळाला. महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी व सरकारी पंच सर्जेराव कांबळे, अश्विनी मंगल यांच्यासमोर पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही वस्तू सीलबंद केल्या. या गुन्ह्णात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कलम लावल्याने नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक सदानंद पाटील, पोलिस निरीक्षक संजय बाबर, सुरेखा वाघमारे, चंद्रकांत शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
डॉ. किरवले स्वत: हजर होते
डॉ. किरवले यांचा बंगला सुमारे २२०० स्केअर फूट जागेत आहे. त्याची बाजारभावाने दीड कोटी रुपये किंमत होते, असे असताना डॉ. किरवले यांनी ४६ लाखाला विकण्याची तयारी कशी दर्शवली. संशयित प्रीतम पाटील याने वेळोवेळी २६ लाख रुपये दिले आहेत. उर्वरित २० लाख रुपये तो रजिस्टेशन करतेवेळी देणार होता तसे त्यांच्यात संचकारपत्र झाले आहे; परंतु त्यांची कन्या अनघा हिने असा व्यवहार झालेला नाही. संशयित आरोपीने बंगल्याच्या खरेदीचा बनाव केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार नोटरी करणारे वकील श्रावण दिनकर वागरे व रेहाना मुबारक शेख यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी दि. ३ मार्च रोजी स्वत: डॉ. किरवले, संशयित प्रीतम पाटील व त्याचे वडील गणपती पाटील हे सत्र न्यायालयात आल्याचे सांगितले तसे जबाब पोलिसांनी घेतले.
बंगल्याच्या व्यवहाराचा दस्त (संचकारपत्र) करण्यासाठी डॉ. किरवले, प्रीतम पाटील, त्याचे वडील गणपती पाटील हे तिघे ३ मार्चला माझ्याकडे आले. त्यांना मी त्यांच्यातील बंगल्याच्या व्यवहाराचा मजकूर लिहून दिला. तो डॉ. किरवले यांनी स्वत: वाचला. यावेळी त्यांनी दस्तावर सही व अंगठा दिला. जाताना त्यांनी मला ‘वकील साहेब, तुमचे अक्षर फारच सुंदर आहे..,’ असे म्हणून पाठीवर थाप मारली, आणि ते सर्वजण निघून गेले.
अ‍ॅड. श्रावण वागरे

Web Title: By asking for more than six lakhs of Kirwala's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.