कोल्हापूर महापालिकेचा डांबर प्रकल्प नवीन जागी होणार स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 04:22 PM2022-11-17T16:22:46+5:302022-11-17T17:04:32+5:30

कोल्हापुरात रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, कंत्राटदार चांगल्या प्रतीचे डांबर वापरत नसल्याचे आरोप होऊ लागल्यावर पालिकेला आपलाही एक डांबर प्रकल्प असल्याची आठवण झाली

Asphalt project of Kolhapur Municipal Corporation will be shifted to a new place | कोल्हापूर महापालिकेचा डांबर प्रकल्प नवीन जागी होणार स्थलांतरित

कोल्हापूर महापालिकेचा डांबर प्रकल्प नवीन जागी होणार स्थलांतरित

googlenewsNext

दीपक जाधव

कोल्हापूर : कसबा बावडा येथील महापालिकेच्या डांबर प्रकल्पातील लाखो लिटर काळे विष उपसूनही पुन्हा प्रकल्पात येत आहे व तिथे असलेल्या कचऱ्यामुळे जागा अपुरी पडत असल्याने तो प्रकल्प बायोमायनीग प्रकल्पाशेजारी स्थलांतरित करण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे १२ ते १५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईची तज्ज्ञांची टीम पाहणी करून गेली असून, मशिनरी चालू करण्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज घेण्यात येत आहे.

कोल्हापूर शहरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, कंत्राटदार चांगल्या प्रतीचे डांबर वापरत नसल्याचे आरोप होऊ लागल्यावर पालिकेला आपलाही एक डांबर प्रकल्प असल्याची आठवण झाली. प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी तो प्रकल्प चालू करण्यासाठी उपायुक्त रविकांत आडसूळ व उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी पाहणी केली.

प्रकल्पावरील कचरा हटवून मशिनरीची डागडुजी केली तर प्रकल्प १५ दिवसांत चालू होईल असे त्यांना वाटले होते. प्रकल्पात कचऱ्यातून झिरपणारे काळे पाणी त्यांना दिसले नव्हते. गेल्या पंधरा दिवसांपासून हे पाणी उपसण्याचे काम चालू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. पाणी जसे काढले जाईल तसे त्यात पुन्हा कचऱ्यातून झिरपणारे पाणी येत असल्याने कमी होत नाही. त्या ठिकाणचा कचराही काढण्यात अडचणी आहेत. प्रकल्प चालू केला तर जागा अपुरी पडत आहे. यामुळेच सध्या असणारा प्रकल्प हा जुन्या एसटीपी प्रकल्पाशेजारी सध्या बायोमायनिंग चालू असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे.

डांबर प्रकल्पातील पाणी काढले तरी पुन्हा पाणी येत आहे. शिवाय कचराही भरपूर आहे. त्या ठिकाणी सीएनटी वेस्ट व शिगरिगेशन शेडचे बांधकाम होणार असून, डांबर प्रकल्पासाठी लागणारी जागा अपुरी आहे. त्यामुळे बायोमायनिंग प्रकल्पाशेजारी डांबर प्रकल्प स्थलांतरित करण्यात येणार आहे. - हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता

Web Title: Asphalt project of Kolhapur Municipal Corporation will be shifted to a new place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.