निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:16 AM2021-07-19T04:16:31+5:302021-07-19T04:16:31+5:30

पार्ट्या, जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने नव्याने ...

Aspirants increased public relations in the wake of the election | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला

Next

पार्ट्या, जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने नव्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भागामध्ये जनसंपर्क वाढवला आहे. अनेकजण लॉकडाऊनला धाब्यावर बसवत मोठ्याने वाढदिवस साजरे करत आहेत. त्यानिमित्ताने पार्ट्या, जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, तर अनेक विद्यमान नगरसेवक आपल्या भागातील कामे करा, अशी निवेदने नगरपालिकेत देऊन आपल्यावरचे खापर नगरपालिकेच्या कारभारावर फोडण्याचा प्रकार करत आहेत. त्यामुळे नागरिकांना निवडणूक जवळ आल्याची चाहुल लागत आहे.

इचलकरंजी नगरपालिकेच्या सभागृहाची मुदत नोंव्हेबर २०२१ला संपत आहे. कोरोनाने साथ दिल्यास मुदतीत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्याने नगरसेवक होण्याचे डोहाळे लागलेले उमेदवार आपापल्या भागात जनसंपर्क वाढताना दिसत आहेत. तरुण कार्यकर्ते सोबत येण्यासाठी स्वत:चे वाढदिवस मोठ्याने करणे तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचेही वाढदिवस जोरात करत आहेत. त्यानिमित्ताने पार्ट्या रंगू लागल्या असून, निवडणुकीतील व्यूहरचनांवर चर्चा केली जाते. कार्यकर्तेही साहेब यंदा जोर लावायचाच म्हणून हवा भरत आहेत. या सगळ्या धांदलीत इच्छुकांना लॉकडाऊनचा मात्र विसर पडल्याचे दिसत आहे. नव्याने इच्छुक असलेल्या तसेच त्याचा थोडाफार जोर असल्याचे जाणवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला काही प्रमुख नेतेमंडळीही भेट देऊन शुभेच्छा देत आहेत.

सध्या नगरपालिकेत नेमकी सत्ता कोणाची आहे आणि विरोधक कोण आहे, याचा ताळमेळ कोणालाच लागत नाही. त्यामुळे नेमका कोणाचा पाठिंबा घ्यावा अथवा कोणत्या पार्टीत जागा मिळेल, हे माहीत नसल्याने अनेकांच्या भागात आश्चर्यकारक पोस्टर बनवून सोशल मीडियावर फिरवले जातात. त्यावर सर्वच प्रमुख नेत्यांचे फोटो स्वत:सोबत वापरतात. नव्याने इच्छुक असणाऱ्यांचे अनेक फंडे चर्चेत येत आहेत. तर विद्यमान नगरसेवकही निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. पाच वर्षांत काय काम केले? असे कोणी विचारू नये म्हणून आपल्या भागातील विकासकामे करा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देत पालिकेत निवेदने दिली जात आहेत.

नगरसेवकाने स्वत: सभागृहात प्रश्न उपस्थित करणे, विकासकामांबाबत आणि येणाऱ्या निधीबाबत जागरूक राहून आपल्या भागातील कामे त्यामध्ये घेण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणे अपेक्षित आहे. परंतु, भागात काम न झालेले नगरसेवक आमच्या भागात कामे करा म्हणून कार्यकर्ते गोळा करून आंदोलन करणे, निवेदन देणे असे प्रकार करण्यात समाधान मानत आहेत. यातून आगामी निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे, हे स्पष्टपणे दिसते.

चौकटी

कोरोना काळात कोण कोण उपयोगी पडले?

विद्यमान नगरसेवक असो अथवा नव्याने इच्छुक असो कोरोनाच्या आपत्कालिन परिस्थितीत हे कोठे होते, याचा मतदारांनी गांभीर्याने विचार करावा. काही मोजक्याच लोकप्रतिनिधींनी भागातील नागरिकांना सहकार्य केल्याचे दिसून आले आहे.

वशिलाबाजीतूनही अन्याय

नगरपालिकेच्या सत्तेतील गोंधळ तसेच प्रमुख नगरसेवकांचा आणि कारभाऱ्यांचा वशिला यातून पिचल्या जाणाऱ्या काही सामान्य नगरसेवकांच्या वाट्याला तुटपुंजी विकासकामे आली.

Web Title: Aspirants increased public relations in the wake of the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.