दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून साडेसात लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 05:27 PM2019-12-02T17:27:19+5:302019-12-02T17:28:09+5:30
राजारामपुरी पाचवी गल्ली येथे दिशा अकॅडमी नावाने आॅफिस सुरू करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून मुंबईच्या भामट्याने लोकांना साडेसात लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयित विलास गणपती वाघमारे (रा. मलुंड, मुंबई) याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : राजारामपुरी पाचवी गल्ली येथे दिशा अकॅडमी नावाने आॅफिस सुरू करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून मुंबईच्या भामट्याने लोकांना साडेसात लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयित विलास गणपती वाघमारे (रा. मलुंड, मुंबई) याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी सांगितले, संशयित विलास वाघमारे याने १ जून २०१९ रोजी राजारामपुरी चौथी गल्ली येथे भाड्याने गाळा घेऊन दिशा अकॅडमी नावाने आॅफिस सुरू केले. लोकांना भेटून चॉईस शेअर ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतविल्यास ५० हजार रुपयांस महिन्याला १५ हजार रुपये परतावा देतो, असे सांगून विश्वास संपादन केला.
जादा परताव्याच्या आमिषाने लोकांनी त्याच्याकडे पैसे गुंतविले. सुरुवातीला त्याने एक हप्ता दिला. त्यानंतर पैसे देण्यास बंद केले. कार्यालयही बंद केले. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष नामदेव कांबळे (३८, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली.
वाघमारे याने अनेक लोकांना गंडा घातला असून, त्याने प्रत्येक जिल्ह्यात शेअर ट्रेडिंगचे कार्यालय सुरू केले होते. पोलीस त्याचा शोध घेत असून, सापडल्यानंतर किती लोकांची फसवणूक झाली, हे स्पष्ट होईल, अशी माहिती निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिली.