धामणीवासीयांना आश्वासनांचे गाजरच
By admin | Published: May 11, 2017 12:14 AM2017-05-11T00:14:41+5:302017-05-11T00:18:18+5:30
धामणीवासीयांना आश्वासनांचे गाजरच
गेल्या २0 वर्षांच्या काळात सरकारे बदलली. मात्र, धामणीवासीयांच्या नशिबी केवळ आश्वासनांची गाजरेच आली. प्रकल्पस्थळासह धामणी खोऱ्यासही भग्नावस्था आली असून, राजकीय अनास्था यासाठी कारणीभूत आहे. श्रेयवादाचे राजकारण आणि धामणीवासीयांचे अज्ञान या सर्वांमुळेच प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्याच वेध घेणारी मालिका ...
महेश आठल्ये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हासुर्ली : धामणी खोऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम प्रशासकीय मान्यतेनंतरही २0 वर्षे अपूर्णावस्थेत आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी धामणीवासीयांनी दोन वेळा विराट मोर्चे काढले. दोनवेळा सुधारित प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रकल्पाची किंमत १२० कोटींवरून तब्बल ८०० कोटींवर पोहोचली. मात्र, आजही या प्रकल्पाचे काम रखडले असून पाणी टंचाईमुळे धामणीवासीयांची होरपळ कायम आहे.
राधानगरी, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांत विभागलेल्या धामणी खोऱ्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, पिके पाण्यावाचून होरपळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, धामणी मध्यम प्रकल्पाचे काम गेली अकरा वर्षे सलगपणे बंद आहे. गेल्या आॅगस्टमध्ये या प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली व या ७८२ कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली. मात्र, याही वर्षी या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात अत्यल्प तरतूद झाल्याने धामणीवासीयांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे. वेळोवेळी केवळ आश्वासनांची गाजरे दाखवायची आणि राजकीय लाभ उठवायचा हेच प्रत्येक सरकारचे धोरण असल्याचे यावरून दिसते.
३.८५ टीएमसी क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पास १९९९ ला मंजुरी मिळाली. मात्र, काम सुरू होण्यास २००० साल उजाडले. दरम्यानच्या काळात अनेकवेळा पुनर्वसनाचा प्रश्न, वनविभागाचा प्रश्न, निधीची कमतरता, आदी कारणांनी प्रकल्पाचे काम रखडले. वेळोवेळी यावर मार्ग काढून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी काम सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. सन २०१० पासून या प्रकल्पाचे काम गेली सलग ११ वर्षे पूर्णपणे बंद आहे. परिणामी, प्रकल्पस्थळास भग्नावस्था आली आली आहे.
गेली २0 वर्षे आम्ही प्रकल्पासाठी जमिनी दिल्या. मात्र, प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे भीषण पाणीटंचाई जाणवते. प्रकल्पग्रस्तांसह लाभधारक शेतकरी सरकारच्या धोरणामुळे देशोधडीला लागला आहे.
- कृष्णात आरबुणे (अध्यक्ष, धामणी धरणग्रस्त संग्राम समिती)
काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम थांबले आहे. त्यावर मार्ग काढणे सुरू असून, धामणी प्रकल्पाचे काम सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी जबाबदार आहे.
- आमदार प्रकाश आबिटकर