कोल्हापुरातील कांचनवाडी येथे शेतीच्या वादावरून प्राणघातक हल्ला, एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 11:40 AM2022-12-30T11:40:12+5:302022-12-30T11:40:35+5:30
परस्पर विरोधी तक्रारी दाखल
म्हालसवडे : कांचनवाडी (ता. करवीर) येथे शेतजमिनीत पोकलेनच्या साह्याने काम सुरू असताना दोन गटात हाणामारी झाली . यावेळी संदीप आनंदा पाटील (वय -३३) या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमीला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, गुरुवारी सकाळी झालेल्या या हाणामारीच्या परस्पर विरोधी तक्रारी करवीर पोलिसात दाखल झाल्या आहेत.
जखमी झालेले संदीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत ते माळ नावाच्या शेतातील बांधाजवळ पोकलेनने बल्डिंग करत होते. यावेळी त्यांना तू बल्डिंग का करतोस म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीत विष्णू भाऊ पाटील, संभाजी मारुती पाटील, रूपाली संभाजी पाटील व अभिजीत रामचंद्र जाधव (सर्व रा. कांचनवाडी) यांनी कोयत्याने डोक्यात प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रूपाली संभाजी पाटील यांच्या फिर्यादीत सचिन आनंदा पाटील, भगवान आनंदा पाटील, आनंदा भिवा पाटील व कृष्णात धोंडू पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे नोंद करण्यात आली आहे.