विधानसभेच्या हालचाली; जिल्हा परिषद, महापालिकेचा बिगुल कधी वाजणार ?, राजकारणी वाट पाहून थकले
By समीर देशपांडे | Published: August 30, 2024 06:20 PM2024-08-30T18:20:51+5:302024-08-30T18:21:06+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : लोकसभेची निवडणूक झाली आणि खासदार दिल्लीला गेले. विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आणि आमदार मुंबईला जाणार, ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : लोकसभेची निवडणूक झाली आणि खासदार दिल्लीला गेले. विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आणि आमदार मुंबईला जाणार, परंतु आपल्याच गावातल्या, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांना मात्र आपल्या नेत्यांच्या फक्त पालख्या वाहण्याची वेळ आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता नव्या वर्षातच या निवडणुकींचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मात्र एक प्रकारचा निरुत्साह पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीतील कार्यकर्ते लोकसभेमुळे जरा उत्साहात आहेत, परंतु महायुतीच्या कार्यकर्त्यांना पदेही नाहीत आणि अन्य लाभ निवडक लोकांनाच, त्यामुळे त्यांच्यातही मोठी नाराजी आहे.
विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित
याआधीच्या नियोजनानुसार २० सप्टेंबरपर्यंत विधानसभेची निवडणूक लागून नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, असा अंदाज होता. परंतु, महाराष्ट्रातील ही निवडणूक आता डिसेंबर २०२४ मध्ये होणार आहे. तसे स्पष्ट संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानेही दिले आहेत.
प्रशासकराज कधी हटणार?
स्थानिक स्वराज्य संस्था - प्रशासक कधीपासून
- कोल्हापूर महापालिका - १५ नोव्हेंबर २०२०
- कोल्हापूर जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समित्या - २१ मार्च २०२२
- इचलकरंजी महापालिका - १ जुलै २०२२
या नगरपंचायती आणि नगरपालिकांवर प्रशासक
जिल्ह्यातील चंदगड आणि हातकणंगले या दोन नगरपंचायतींचे नगराध्यक्ष सध्या कार्यरत आहेत. उर्वरित आजरा नगरपंचायत, गडहिंग्लज, मुरगुड, कागल, पन्हाळा, पेठ वडगाव, हुपरी, कागल, जयसिंगपूर, कुरूंदवाड, शिरोळ अशा ११ ठिकाणी सध्या प्रशासक राज आहे.
राजकारणी वाट पाहून थकले
कोल्हापूर महापालिकेचे इच्छुक नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे विविध पक्षांचे इच्छुक कार्यकर्ते, पदाधिकारी या निवडणुकांची वाट पाहून थकले. कोल्हापूर शहरात, तर दिवाळीच्या फराळापासून किल्ल्यांच्या स्पर्धेपर्यंत, रेकॉर्ड डान्सपासून फुटबॉल स्पर्धेपर्यंत अनेकांनी पैसे लावले, परंतु महापालिका निवडणुका काही जाहीर होईनात. हीच परिस्थिती नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांची झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुका महायुती सरकार जाणीवपूर्वक घेत नाही. परिणामी आयुक्त कोणत्याही धोरणात्मक बाबीवर निर्णय घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे शहरांच्या विकासाला खीळ घालण्याची भूमिका महायुतीची असून, त्याचा परिणाम त्यांना विधानसभेला दिसेल. - सचिन चव्हाण, शहराध्यक्ष, कॉंग्रेस.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मनपा, नगरपालिका निवडणुका नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संधीच्या शोधात आहेत, ही वस्तुस्थिती आहे, परंतु या निवडणुका विधानसभेनंतर होतील. सध्या आम्ही विधानसभेवर लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे काम सुरू आहे. - नाथाजी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष.
कारणे काहीही असतील, तरीही या निवडणुकांना विलंब झाला आहे, हे खरे आहे. सध्याच्या परिस्थितीत आता विधानसभा होणार असल्याने त्यानंतरच या सर्व निवडणुका होणार आहेत. आम्ही त्यासाठी तयारी केली आहे. - बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती विस्कटणार आहे. त्यामुळेच सत्तारूढ महायुती या निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे पक्षासाठी राबणारा कार्यकर्ता नाराज झाला आहे. - व्ही. बी. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट
गेले चार वर्षे महापालिकेचे सभागृह अस्तित्वात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची महापालिकेकडील कामे होण्यास अनेक अडचणी येत आहेत. कार्यकर्तेही कधी निवडणूक लागते, या प्रतीक्षेत आहेत. मध्यंतरी आरक्षणही जाहीर झाले आणि परत प्रक्रिया थांबली, परंतु ही निवडणूक लवकर होण्याची गरज आहे. - सुजित चव्हाण, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष.
भाजपला या निवडणुकांमध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. त्यांना फक्त खासदार, आमदारांच्या निवडणुकीची काळजी आहे. खाली कार्यकर्त्यांचे काय व्हायचे ते हाेऊ दे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांना सत्ता केंद्रित करायची असल्याने ते निवडणुका घेत नाहीत, हे वास्तव आहे. - सुनील शिंत्रे, जिल्हाध्यक्ष, उद्धवसेना.