कोल्हापूर जिल्ह्यात दहा लाख लाडक्या बहिणी; उमेदवारीसाठी चर्चा मात्र पाचजणींचीच
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 22, 2024 12:52 PM2024-10-22T12:52:59+5:302024-10-22T12:53:42+5:30
पक्षांकडून निवडणुकीतून कायमच बेदखल : मतपेटीतील लाभापुरताच विचार
इंदुमती गणेश
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाने गेल्या तीन महिन्यांत महिलांची मते पदरात पाडून घेण्यासाठी योजनांचा धडाका लावलेला असताना निवडणूक लढविण्यासाठी मात्र महिलांचा विचार केलेला नाही. मतांसाठी जिल्ह्यातील दहा लाख महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ दिला आहे, पण यंदाच्या निवडणुकीत आमदार जयश्री जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, नंदिनी बाभूळकर, शौमिका महाडिक आणि स्वाती कोरी यांचीच चर्चा झाली. त्यादेखील अंतिम उमेदवार असतील की नाही हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. राजकारणातदेखील पुरुषप्रधान संस्कृतीलाच महत्त्व असल्याचे हे द्योतक आहे.
लोकसभा निवडणूक पार पडताच राज्य शासनाने मतदारांवर योजनांचा पाऊसच सुरू केला तो आत्ता आचारसंहिता लागल्यावर थांबविला. यात लोकप्रिय झाली ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महिला मतदारांचा एकदा विश्वास संपादन केला की निवडणुकीचा विजयापर्यंतचा प्रवास सोपा होतो हे यामागचे खरे गणित. योजना किती काळ चालेल माहिती नाही; पण हातात पैसा आल्याने महिलादेखील खुश आहेत. त्याचा महायुतीला फायदा झाला की नाही ह दि. २३ नोव्हेंबरला समजेलच. महिलांचा विचार फक्त मतपेटीसाठीच केला गेला आहे. उमेदवारीचा विषय आला की पुरुषप्रधान मानसिकता स्त्रीला उंबऱ्याच्या आतच थांबायला लावते.
महिला आमदारांची पार्श्वभूमी सारखीच
- कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव यांच्या रूपाने कोल्हापुरात एकमेव महिला आमदार आहेत, ही संधीदेखील त्यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर मिळाली. राजकीय इतिहासाकडे वळून बघितले तर आजवरच्या महिला आमदारांची पार्श्वभूमी फार वेगळी नाही.
- कोल्हापूर उत्तरमधून आमदार जयश्री जाधव व मधुरिमाराजे छत्रपती यांची, चंदगडमधून डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या नावाची चर्चा आहे. कागलमधून स्वाती कोरी यांचे नाव फक्त एकदा चर्चेत आले. त्यांच्यापैकी काेणाला उमेदवारी मिळते की पुरुषाचाच नंबर लागतो हे पुढील आठवड्यात कळेल.
- शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद, गोकुळच्या माध्यमातून आपले नेतृत्व सिद्ध केल्याने कोल्हापूर दक्षिणमधून त्यांचे नाव पुढे आले होते, पण आता ती शक्यता धूसर आहे. कारण अमल लढणार असा स्टेटस त्यांनी स्वत:च परवा लावला होता.
कार्यकर्त्या प्रचारापुरत्याच..
महिला कार्यकर्त्यांनी नेतृत्वाची इच्छा असली तरी पत, पैसा, पाठिंब्यांमध्ये त्यांची शक्ती कमी पडते. त्यामुळे त्यांची भूमिका फक्त नेत्यांच्या मागे फिरत प्रचारापुरतीच मर्यादित राहते.
ही आहेत कारणे
- घराण्यातील पुरुषाचे राजकीय करिअर संपण्याची भीती
- पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा
- राजकारणाचा बदललेला पोत आणि प्रचंड आव्हान.
- पाण्यासारखा पैसा ओतण्याची क्षमता
- शह काटशह, साम, दाम, दंड अशा सर्वंकष प्रकारात नेतृत्व विकसित करण्याचे आव्हान
राजकारण नेहमीच पुरुषसत्ता केंद्री राहिलेले आहे. त्यात आजचे राजकारण सरळसोट राहिलेले नाही, पैसा, जनसंपर्क, पाठिंबा, वरिष्ठ राजकीय पातळीवरील संबंध, कौटुंबिक पाठिंबा या पातळीवर महिलांची पीछेहाट होते. पुरुषांच्या महत्त्वाकांक्षांपुढे महिलांची महत्त्वाकांक्षा दुय्यम ठरल्याने त्या सक्षम असल्या तरी राजकारणातील सहभाग नगण्य आहे. - प्रा. डॉ. भारती पाटील, राजकीय विश्लेषक