ए.एस ट्रेडर्सच्या पाचशे एजंटांची मालमत्ता होणार जप्त, लोहितसिंगच्या अलिशान कारची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:20 PM2023-08-08T16:20:28+5:302023-08-08T16:20:48+5:30
मालमत्ता लपवण्याचा किंवा परस्पर दुसऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित एजंटवर अटकेची कारवाई करणार
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीसाठी कमिशन एजंट म्हणून काम केलेले सुमारे पाचशेहून अधिक एजंट आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या रडारवर आले आहेत. कंपनीकडून एजंटना मिळालेले कमिशन, दुचाकी, कार, फ्लॅट तातडीने पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांनी एजंटना दिल्या आहेत. अन्यथा त्यांच्यावर अटकेची कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीचे एजंट आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात मिळवलेल्या कमिशनमधून एजंटनी लाखो रुपयांची माया जमवली आहे. एजंटही फसवणुकीला जबाबदार असल्याने त्यांनी कंपनीच्या व्यवहारांमधून मिळवलेली मालमत्ता जप्त केली जाणार आहे.
कंपनीतून जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुमारे ५०० एजंटची यादी तयार केली आहे. त्यांना कंपनीकडून मिळालेले कमिशन, दुचाकी, कार, फ्लॅट यांचीही माहिती पोलिसांकडे आहेत. काही प्रमुख एजंटना बोलवून त्यांच्याकडील वस्तू आणि रक्कम पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मालमत्ता लपवण्याचा किंवा परस्पर दुसऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित एजंटवर अटकेची कारवाई करणार असल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सांगितले.
लोहितसिंगच्या कारची विक्री
या गुन्ह्यातील प्रमुख संशयित लोहितसिंग सुभेदार याने त्याची सुमारे सव्वा कोटी रुपयांची अलिशान कार मुंबईतील एका कार डिलरला विकली. ती कार सध्या मुंबईतील एका शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवली आहे. तिची किंमत ७४ लाख रुपये सांगण्यात आली. ही कार जप्त करण्याचा प्रयत्न आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.
साने गुरुजी वसाहतीत प्लॉट
साने गुरुजी वसाहतीमध्ये लोहितसिंगने एक प्लॉट खरेदी केला होता. अटकेतील महिला संचालक सुवर्णा सरनाईक हिला त्या व्यवहाराची माहिती होती. पोलिसांनी प्लॉटची कागदपत्रे जप्त करून त्याची विक्री होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. अन्य संचालकांच्याही मालमत्ता जप्त करण्याचे काम गतीने सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी गायकवाड यांनी दिली.
एएस ट्रेडर्समध्ये गुंतणुकीची रक्कम वाढवण्यात एजंट लोकांचा मोठा हात आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी कंपनीने त्यांना दिलेल्या भेटवस्तू आणि कमिशनमधून खरेदी केलेल्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. एजंटनी स्वत:हून त्यांच्याकडील मालमत्तांची माहिती पोलिसांना द्यावी. - स्वाती गायकवाड - तपास अधिकारी