मृत जनावरांसाठी पहिल्या टप्प्यात ७० लाखांची मदत- : शासनाकडे साडेतीन कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 01:20 AM2019-10-03T01:20:15+5:302019-10-03T01:25:03+5:30
आतापर्यंत जिल्ह्णात मृत १४६ मोठी दुधाळ जनावरे, ५७ छोटी दुधाळ जनावरे, १२ ओढकाम करणारी मोठी जनावरे व छोटी ३ जनावरे असे मिळून ४२ लाख दोन हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत.
प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : महापुरात दगावलेल्या जनावरे व पक्ष्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील मदत वाटप सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत २१५ पाळीव छोटी-मोठी जनावरे व १० हजार कोंबड्यांसाठी सुमारे ७० लाख रुपये संबंधितांना वितरित केले आहेत. राज्य शासनाकडे मृत जनावरे व पक्ष्यांसाठी एकूण सुमारे साडेतीन कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
गेल्या महिन्यात महापुराने थैमान घातले होते. यामध्ये मनुष्यहानी झाली नसली तरी पाळीव जनावरे, पक्षी, कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत झाल्या होत्या. त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन कोटी ४२ लाख ११ हजार रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने मदत येत आहे. दुधाळ मोठी जनावरे (गाय, म्हैस) यांच्यासाठी प्रत्येकी ३० हजार याप्रमाणे व ओढकाम करणारे (बैल, घोडा) यासाठी २५ हजार याप्रमाणे, दुधाळ छोट्या जनावरांसाठी (शेळ्या व मेंढया) तीन हजार रुपये, छोटे ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी (गाढव, खेचर) १६ हजार रुपये, तर कोंबड्यांसाठी प्रत्येकी ५० रुपये याप्रमाणे मदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार त्याचे टप्प्याटप्प्याने वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्णात मृत १४६ मोठी दुधाळ जनावरे, ५७ छोटी दुधाळ जनावरे, १२ ओढकाम करणारी मोठी जनावरे व छोटी ३ जनावरे असे मिळून ४२ लाख दोन हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत.
- निर्वाह भत्त्यासाठी ५४ लाखांची मागणी
महापुराच्या काळात स्थलांतरित झालेल्या जनावरांसाठीही शासनाने भत्ता निश्चित केला आहे. त्यानुसार छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी ३४ रुपये व मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी ७० रुपयांप्रमाणे दिले जात आहेत. स्थलांतरित केलेल्या ९४ हजार पाळीव छोट्या-मोठ्या जनावरांसाठी निर्वाह भत्त्याकरिता ५४ लाख ९१ हजार रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील २७ लाख रुपये आले असून, त्याचे वाटप करण्यात आले आहे.
- महापुरात ४५ हजार जनावरे, कोंबड्या मृत
महापुरामुळे जिल्ह्यातील ४४ हजार ३४९ कोंबड्या, ८०८ गायी व म्हशी, २७० शेळ्या व मेंढ्या, २३ बैल व घोडे, १७९ गाढव, खेचर, वासरू मृत झाले आहेत.
महापुरामुळे जिल्ह्यातील मृत जनावरे व पक्ष्यांसाठी मदत वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे ७० लाख रुपयांची मदत वाटप केली आहे. शासनाकडे मदतीसाठी केलेल्या निधीच्या मागणीनुसार टप्प्या-टप्प्याने मदत येत आहे.
- भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी