दोन लाखांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्तास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 10:45 AM2020-10-09T10:45:28+5:302020-10-09T10:47:36+5:30
Bribecace, Crime News, Police, kolhapur अतिवृष्टीमुळे जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडले.
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडले.
प्रदीप केशव सुर्वे (रा. ब्ल्यू अपार्टमेंट, कारंडेमळा, कोल्हापूर. मूळ गाव-तांदूळवाडी, माळशिरस, जि. सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई लक्ष्मीपुरी परिसरातील एका कार्यालयात केली.
विभागाने दिलेली माहिती, सुर्वेकडे कसबा बावडा येथील मत्स्त्य व्यवसाय कार्यालयात मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्तपदाचा कार्यभार आहे. तक्रारदार यांचा मत्स्य उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन जलाशय ठेके तत्त्वावर आहेत.
२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या होत्या. यानंतर राज्य शासनाने पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाई जाहीर केली. तक्रारदारांच्या संस्थेच्या जलाशयांचे महसूल विभागामार्फत रीतसर पंचनामे केले होते. नुकसानभरपाई मिळण्यासाठी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.
प्रस्तावानुसार शासनाने तक्रारदारांच्या संस्थेस माशांची नुकसान भरपाई म्हणून २६ लाखांची रक्कम त्यांच्या संस्थेच्या बँक खात्यावर सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयामार्फत दि. १४ सप्टेंबरला जमा केली. पण, अद्याप त्यांना मत्स्य जाळ्यांची नुकसानभरपाई मिळाली नाही.
दरम्यान, आठवडाभरापूर्वी तक्रारदारांची संशयित प्रभारी सहायक आयुक्त सुर्वेची भेट झाली. त्यावेळी सुर्वेने कार्यालयामार्फत पाठविलेल्या प्रस्तावामुळेच २६ लाख रुपये भरपाई मिळाली. त्याबदल्यात १० लाख रुपये सुर्वेने त्यांच्याकडे मागितले. नाहीतर उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले. सात लाख रुपये व तडजोडीनंतर तक्रारदारांकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता दोन लाख व नंतर उरलेले देण्यास सांगितले.
तक्रारदारांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे लाचेची तक्रार केली. त्याची विभागाने पडताळणी केली. दरम्यान, गुरुवारी संशयित सुर्वेने तक्रारदारांना फोन करून लक्ष्मीपुरी परिसरात त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना सापळा रचलेल्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, कर्मचारी शरद पोरे, अजय चव्हाण, रूपेश माने, मयूर देसाई व चालक सूरज अपराध यांनी केली.