सहायक कामगार आयुक्तांना रस्त्यावरच रोखले -: संभाजी ब्रिगेड माथाडी, जनरल कामगार युनियनचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:22 AM2019-05-21T00:22:03+5:302019-05-21T00:26:04+5:30
औद्योगिक क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत
कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले. सहायक कामगार आयुक्त ए. डी. गुरव यांना घेराव घालत कार्यालयात जाण्यापासून रस्त्यावरच रोखल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला.
भर दुपारी उन्हात सुमारे अर्धा तास आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना कामगारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी ३० मे रोजी बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी गुरव यांनी दिले.गोकुळ शिरगावमधील इंडोकाऊंट व परिसरातील कंपनीतील कामगारांना कामावरून बेकायदेशीर कमी केले जात आहे. दिवाळी सुटीतील कामगारांचा पगार द्यावा, कामगारांच्या कामात ऐनवेळी बदल करून त्यांची हेळसांड केली जाते. खात्यांतर्गत कामगारांची त्रास देण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर चौकशी लावली जात आहे. कामगारांना दमदाटी केली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्यांना रात्रपाळी सक्तीची केली आहे. याबाबत सहायक कामगार आयुक्तांनी लक्ष घालावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनतर्फे सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सहायक कामगार आयुक्त ए. डी. गुरव हे बाहेरून कार्यालयासमोर आले. त्यावेळी आंदोलकांनी त्यांना कार्यालयात जाण्यापासून रस्त्यावरच रोखून निदर्शने केली. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सुमारे अर्धा तास भरउन्हात हा प्रकार सुरू होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी घडवून आणत गुरव यांना कार्यालयात जाणे भाग पाडले. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत आयुक्त गुरव यांनी चर्चा करून कामगारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी दि. ३० मे रोजी सकाळी पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्यासह गिरीष फोंडे यांनी केले. यावेळी भगवान कोर्इंगडे, सुनील जाधव, अभिजित कात्रट, कृष्णात नवघरे, योगेश जगदाळे, अजिंक्य पोवार, प्रवीण जगदाळे, अरुण जकाते, संताजी घोरपडे, बाबू निकम, नामदेव मोरे, प्रकाश पाटील, राजू नाईक, दत्ता पिसाळ, आदी उपस्थित होते.
फलकावरील ‘कार्टून’ने वेधले लक्ष
आंदोलक कामगारांच्या हातातील फलकावर सहायक कामगार आयुक्त यांच्याबाबत कार्टून चित्रे रेखाटली होती. ही चित्रे लक्षवेधी होती. त्याबाबत परिसरात चर्चा सुरू होती.
कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सहायक कामगार आयुक्त ए. डी. गुरव यांना घेरावो घालून कार्यालयात जाण्यापासून रोखले. दुसºया छायाचित्रात आंदोलक कामगारांनी निदर्शने करून गुरव यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.