सहायक आयुक्तांना ‘स्थायी’तून बाहेर काढले
By admin | Published: October 8, 2016 01:01 AM2016-10-08T01:01:38+5:302016-10-08T01:02:55+5:30
प्रकाश गवंडी यांच्यावरील गुन्ह्याचे पडसाद : गुन्हा दाखल केल्याप्रकरणी खाडे यांना सदस्यांनी विचारला जाब
कोल्हापूर : नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांच्या विरोधात प्रशासनाकडून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या प्रकाराचे पडसाद शुक्रवारी महानगरपालिका स्थायी समिती सभेत उमटले. गवंडींच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या सहायक आयुक्त सचिन खाडे यांना सभा सुरू झाल्यानंतर सभागृहातून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांचा निषेध करून ही सभा तहकूब करण्यात आली. यावेळी गुन्हा दाखल का केला, म्हणून खाडे यांना सर्वच सदस्यांनी जाब विचारला.
गुरुवारी रात्री सहायक आयुक्त सचिन खाडे यांनी नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रभाग समितीच्या सभेत आपणास कोंडून ठेवले, धमकी दिली, असा आरोप खाडे यांनी केला होता. त्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी स्थायी समिती सभेत उमटले. कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी सत्यजित कदम यांनी खाडे-गवंडी वादाविषयी विचारणा केली; पण आधी विषयपत्रिकेवरील विषय संपवू आणि मग त्या विषयावर चर्चा करू, अशी विनंती सभापती मुरलीधर जाधव यांनी केली. त्यामुळे विषयपत्रिकेवरील चर्चा झाल्यानंतर खाडे-गवंडी वादावर चर्चा सुरू झाली.
सभापती जाधव, सत्यजित कदम, सूरमंजिरी लाटकर, नीलेश देसाई, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम यांच्यासह सर्वच सदस्यांनी सहायक आयुक्त खाडे यांना घेरले. काल काय झाले याची माहिती द्या, असे त्यांना सुनावले. खाडे काही सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच कदम, लाटकर यांनी त्यांनाच दमात घेतले. तुम्ही थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापूर्वी महापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते, प्रभाग समिती सभापती यांच्या कानावर ही गोष्ट का घातली नाही, अशी विचारणा करण्यात आली. कोणाचा दबाव होता का? तुम्हाला रक्तदाब, हायपर टेन्शनचा त्रास आहे का, अशी विचारणाही नगरसेवकांनी त्यांना केली.
प्रश्नांच्या सरबत्तीने सहायक आयुक्त खाडे भेदरले. त्यांना काहीही सुचत नव्हते. सभापती जाधव यांनी खाडे यांचा निषेध करत असल्याचे सांगून त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचा आदेश दिला. त्यामुळे खाडे निमूटपणे सभागृहातून बाहेर गेले. त्यानंतर सभागृहात खाडे यांच्या वर्तणुकीचा निषेध करून सभेचे कामकाज तहकूब केले. या प्रकारामुळे सर्वच अधिकारी मात्र हबकून गेले. (प्रतिनिधी)
दमबाजी होत असताना बघत बसू काय? : आयुक्त
नगरसेवक तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून अधिकाऱ्यांना जर दमबाजी होत असेल आणि महापालिकेच्या कामकाजात त्यांचा सातत्याने हस्तक्षेप होत असेल तर आयुक्त म्हणून नुसते बघत बसायचे काय? असा शब्दांत आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईचे समर्थन केले.
गेल्या वर्षभरात कामकाजातील हस्तक्षेपाचे अनेक प्रकार घडले. अधिकाऱ्यांना दमबाजी झाली. मारहाण, शिवीगाळीचे प्रकार घडले. कर्मचारी असो की अधिकारी; यांच्याबाबत घडणाऱ्या घटना योग्य नाहीत. याला कोठेतरी पायबंद बसला पाहिजे होता; म्हणून शुक्रवारी फौजदारी करण्याचे आदेश दिले, असे शिवशंकर यांनी सांगितले.
यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून अनेकांनी विनंती केली. स्थानिक अधिकारी तक्रार द्यायला घाबरतात म्हणून यापूर्वी मला काही करता आले नाही. सहायक आयुक्त हा सरकारी अधिकारी आहे. त्यालाच जर दमबाजी होत असेल तर आयुक्त म्हणून मी काय बघत बसावे का? यापुढेही अशाच घटना घडत गेल्या तर कारवाई ही करावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
४\३तीन नगरसेविकांसह सात अधिकाऱ्यांना नोटीस
१ महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभेतील कामकाजात नातेवाइकांनी केलेल्या हस्तक्षेपाबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी तीन नगरसेविकांना नोटीस बजावली आहे; तर याच सभेस गैरहजर राहणाऱ्या सहा अधिकाऱ्यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे. त्यांना सात दिवसांची मुदत दिली असून, खुलासा आला नाही तर कारवाईचा इशारा दिला आहे.
नगरसेविका माधवी गवंडी यांच्यासह सुनंदा मोहिते, अनुराधा खेडकर यांना ही नोटीस बजावली आहे. गवंडी, मोहिते व खेडकर यांचे पती गुरुवारी झालेल्या प्रभाग समिती सभेस उपस्थित राहून सभेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत होते, असा आयुक्तांचा दावा आहे. महापालिकेच्या कामात नगरसेविकांच्या पतींना, अन्य नातेवाइकांना हस्तक्षेप करता येणार नाही, अशी सूचना आयुक्त शिवशंकर यांनी यापूर्वी नगरसेवकांना दिलेली आहे. तरीही सभेत हा हस्तक्षेप झाल्यामुळे कारवाईचे पाऊल उचलले.
२ गुरुवारी (दि. ६) शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभेत सहायक आयुक्त सचिन खाडे आणि माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांच्यात झालेल्या बाचाबाचीमुळे आयुक्त शिवशंकर यांनी ही बाब अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. नगरसेविकांच्या नातेवाइकांचा कामकाजातील वाढता हस्तक्षेप लक्षात घेऊन आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
गुरुवारच्या प्रभाग समिती सभेस गैरहजर राहिल्याप्रकरणी अभियंता रावसाहेब चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बी. जी. कुराडे, इस्टेट विभागाचे प्रमुख प्रमोद बराले, बागा खात्याचे सहायक अधीक्षक गणेश खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अकौंटंट अशोक यादव, घरफाळा विभागाचे सहायक अधीक्षक तानाजी मोरे, विद्युत शाखेचे प्रमोद दळवी यांनाही आयुक्तांनी नोटीस बजावली. प्रभाग समितीच्या सभेस उपस्थित न राहिल्याने नोटीस बजावली.