१५ हजाराची लाच घेताना 'महावितरण'च्या सहायक अभियंत्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 06:14 PM2022-03-02T18:14:23+5:302022-03-02T18:24:56+5:30
कामाची बिले मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाचेची मागणी
कोल्हापूर : कामाची बिले मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना महावितरणचा सहायक अभियंत्यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. धर्मराज विलास काशीदकर (वय ४०) असे या अभियंत्याचे नाव आहे. ताराबाई पार्क येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराने महावितरण ग्रामीण विभाग-२ अंतर्गत ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगची कामे केली होती. त्याची बिले मंजूर करण्यासाठी ते धर्मराज काशीदकर यांच्याकडे गेले होते. यावेळी काशीदकर याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यानुसार आज बुधवारी सापळा रचण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक फौजदार संजीव बंबर्गेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, कॉन्स्टेबल मयूर देसाई, रुपेश माने यांनी ही कारवाई केली.