सहायक फौजदारास बेदम मारहाण

By admin | Published: May 24, 2016 12:42 AM2016-05-24T00:42:12+5:302016-05-24T00:58:49+5:30

दोघा मद्यपींना अटक : उमा टॉकीज चौकातील घटना

Assistant Fougdars breathless assault | सहायक फौजदारास बेदम मारहाण

सहायक फौजदारास बेदम मारहाण

Next



कोल्हापूर : उमा टॉकीज सिग्नल चौकात रेड सिग्नल पडल्यानंतर थांबण्याचा इशारा केल्याचा राग मनात धरून दोघा मद्यपी तरुणांनी वाहतूक शाखेच्या सहायक फौजदारास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. जानबा शंकर देसाई (वय ५७, रा. पोलिस लाईन, मुख्यालय) असे त्यांचे नाव आहे.
सोमवारी भर दिवसा रस्त्यावर पोलिसाला होत असलेली मारहाण पाहून नागरिकांनी दोघा तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित आरोपी साईदास संजय शिंदे (वय २७, रा. टेंबे रोड, शिवाजी स्टेडियम), प्रीतम सतीश शिंदे (३०, रा. रविवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. गेल्या दोन महिन्यांत वाहतूक शाखेच्या पोलिसांना मारहाण झालेली ही तिसरी घटना आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, उमा टॉकीज सिग्नल चौकात वाहतूक विभागाचे सहायक फौजदार जानबा देसाई हे ड्युटीवर होते. दुपारी चारच्या सुमारास रेड सिग्नल लागल्याने गोखले कॉलेजकडून येणाऱ्या वाहनांना देसाई यांनी हाताने थांबण्याचा इशारा केला. यावेळी दुचाकीवरून दोघे तरुण पुढे आले. त्यांनी देसाई यांना अरेरावी करीत आम्हाला थांबायला का लावतोस? असे म्हणून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने ते लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नरला वळसा घालून माघारी आले. चौकात उभ्या असलेल्या देसाई यांच्यासमोर येऊन त्यांना आम्हाला का थांब म्हणत होतास, अशी एकेरी भाषा वापरून शिवीगाळ केली. यावेळी देसाई यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांची कॉलर धरून फिल्मी स्टाईलने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भर रस्त्यावर वृद्ध पोलिसाला मारहाण होत असलेली पाहून वाहनधारक व नागरिकांची गर्दी झाली. काही नागरिकांनी पुढे होत त्या तरुणांच्या तावडीतून देसाई यांची सुटका केली. त्यानंतर पळून जाणाऱ्या तरुणांना नागरिकांनी पकडले. यावेळी दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती वायरलेसवरून शहर वाहतूक शाखेस व लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. काही क्षणांतच पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती देसाई व नागरिकांकडून घेतली. त्यानंतर त्या तरुणांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी त्यांच्याकडे पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केली असता त्यांनी नाव, पत्ता सांगितला. त्यांच्या विरोधात देसाई यांची फिर्याद घेऊन मारहाण, सरकारी कामात अडथळा या कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. संशयितांची रात्री सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीही केली. या प्रकाराने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

शिवी दिल्याने मारहाण
साईदास शिंदे हा मार्केटिंगचा व्यवसाय करतो. आझाद चौक येथे त्याचे कार्यालय आहे. सकाळी तो कामानिमित्त शिराळ्याला गेला होता. दुपारी येऊन उद्यमनगर येथून मित्र प्रीतम शिंदे याला घेतले. त्यानंतर दारू ठोसून तेथून ते दुचाकीवरून लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नरमार्गे रविवार पेठेतील घरी निघाले असताना त्यांनी हा प्रकार केला. सहायक फौजदार देसाई यांनी आईवरून शिवी दिल्याने त्यांना आम्ही जाब विचारायला गेलो होतो. त्यावेळी आमच्यात धक्काबुक्की झाल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या दोघांना अटक झाल्याचे समजताच दोघांचेही नातेवाईक लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले.



शहरात पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होते. प्रत्येक सिग्नल चौकात एकटा पोलिस वाहतुकीवर नियंत्रण ठेवत शिस्त लावत असतो. अशावेळी एकटेपणाचा गैरफायदा घेत काही उद्धट लोक पोलिसाला दादागिरी व मारहाण करण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे वाहनधारकांचे पोलिसांना अरेरावी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- आर. आर. पाटील, पोलिस
निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

Web Title: Assistant Fougdars breathless assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.