सहायक कामगार आयुक्तांनी मागितली २५ हजारांची लाच

By admin | Published: May 6, 2016 01:00 AM2016-05-06T01:00:39+5:302016-05-06T01:11:27+5:30

लघु टंकलेखकाला पकडले : ‘लाचलुचपत’च्या कारवाईने खळबळ

Assistant Labor Commissioner asked for a bribe of Rs 25,000 | सहायक कामगार आयुक्तांनी मागितली २५ हजारांची लाच

सहायक कामगार आयुक्तांनी मागितली २५ हजारांची लाच

Next

कोल्हापूर : रुग्णालयाचे रितसर नोंदणीपत्र आणि कंत्राटी कामगाराचा ठेका पुरविण्याचा परवाना मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचा लघु टंकलेखक संशयित संजय जगन्नाथ पाटील (वय ३२, सध्या राहणार शाहूपुरी, व्यापारी पेठ, कोल्हापूर, मूळ राहणार घन:शामनगर, माधवनगर रोड, हॉटेल प्रशांतसमोर, प्लॉट नंबर १९३, सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
पकडल्यानंतर संजय पाटीलने सहायक कामगार आयुक्त संशयित सुहास रामचंद्र कदम (सध्या राहणार संभाजीनगर, कोल्हापूर, मूळ
राहणार गिरवी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या सांगण्यावरून ही २५ हजार रुपयांची लाच घेतली असल्याच पोलिसांना सांगितले. ही कारवाई गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाहूपुरी व्यापारी पेठेतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात केली. कदम हे गुरुवारपासून तीन दिवस रजेवर असून, त्यांनाही या प्रकरणी अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, उचगाव (ता. करवीर) येथील विजय शिवाजी हंकारे (रा. मंगेश्वर कॉलनी) यांना वैद्यकीय व्यवसायासाठी कंत्राटी कामगारांचा ठेका पुरविण्याचा परवाना पाहिजे होता. त्याचबरोबर मेहुणा कौस्तुभ वायकर यांच्या मंगळवार पेठ, बेलबाग येथील यांच्या रुग्णालयासाठी रितसर नोंदणीपत्र या दोन्ही कामांच्या माहितीसाठी हंकारे हे सहायक कामगार आयुक्त कार्यालयात गेले. तेथे या संबंधीची माहिती घेतल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांची भेट घेतली. कदम यांनी या दोन्हींसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागेल व त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन या. प्रथम रुग्णालयाची नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी झाल्यानंतर आठ दिवसांनी कामगार ठेका पुरविण्याच्या परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागेल. त्याप्रमाणे त्यांनी ‘आपले सरकार’या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज भरा. त्यासाठी ‘लघुटंकलेखक संजय पाटील यांना भेटा’ असे त्यांनी हंकारेंना सांगितले. त्याप्रमाणे हंकारे हे पाटील यांना भेटले. त्यानुसार मेहुणे डॉ. वायकर यांच्या हॉस्पिटलला रितसर नोंदणी मिळावी, असा आॅनलाईन अर्ज हंकारेंनी प्रथम भरला. हा अर्ज भरल्यानंतर सुहास कदम यांनी या अर्जामध्ये त्रुटी आहेत. पुन्हा नव्याने दुरुस्ती करून हा अर्ज भरा, असे त्यांना सांगितले. बुधवारी (दि. ४) या दोन्ही कामांसाठी हंकारे हे कार्यालयात पुन्हा आले. त्यांनी सुहास कदम यांच्याबरोबर यावर चर्चा केली. या चर्चेवेळी कदम यांनी रुग्णालय नोंदणी व कामगार ठेका परवाना या दोन्ही कामांसाठी ‘मला २५ हजार रुपये द्यावे लागतील, यासाठी लघुटंकलेखक पाटील यांना भेटा’ असे सांगितले. त्यावर हंकारेंनी पाटील यांची भेट घेतली असता ‘मलाही काही पैसे द्यावे लागतील’ असे त्यांना सांगितले.
दरम्यान, विजय हंकारे यांनी याबाबतची तक्रार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात सापळा रचला. यानंतर हंकारे यांनी मोबाईलवरून पाटील यांच्याशी संपर्क साधून ‘कार्यालयात पैसे घेऊन आलो आहे’, असा फोन केला. त्यावर त्यांनी माझ्या केबिनमध्ये या, असे पाटील याने त्यांना सांगितले. सुहास कदम यांचे २५ हजार रुपये आणले आहेत, तुमचे दोन हजार रुपये दुपारी तीन नंतर देऊ, असे हंकारे यांनी सांगून पाटीलला २५ हजार रुपये दिले. त्यावेळी ही लाच स्वीकारताना पाटीलला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल श्रीधर सावंत, मनोज खोत, दयानंद कडूकर, सर्जेराव पाटील, संदीप पाटील यांनी केली.

कदम यांचा मोबाईल स्विच आॅफ; शोध सुरू
संशयित संजय पाटील याला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून सुहास कदम यांंच्याशी संपर्क साधला; पण कदम यांनी फोन उचलला नाही. थोड्या वेळाने पुन्हा कदम यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच आॅफ लागला. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी कोल्हापुरातील संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पथक पाठविले होते; पण ते गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सापडले नव्हते.

Web Title: Assistant Labor Commissioner asked for a bribe of Rs 25,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.