सहायक अधीक्षकास नगरसेवकाची मारहाण
By admin | Published: November 18, 2016 12:42 AM2016-11-18T00:42:38+5:302016-11-18T00:42:38+5:30
घरफाळ्यावरून वाद : कार्यालयातील खुर्च्या, फायली फेकल्या; मनपा कामकाज बंद, कर्मचाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त
कोल्हापूर : ‘माझ्या प्रभागात मला विचारल्याशिवाय तू घरफाळा का लावलास?’ अशा मालक असल्याच्या अविर्भावात शिवसेनेचे नगरसेवक अभिजित चव्हाण, त्यांचा साथीदार महेश तांबे यांनी महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयातील घरफाळा विभागाचे सहायक अधीक्षक विशाल बाळासाहेब सुगते यांना बेदम मारहाण केली, तर कार्यालयातील खुर्च्या, फायली भिरकावल्या. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घडलेल्या या मारहाणीचे संतप्त पडसाद महानगरपालिकेच्या कामकाजावर उमटले. सर्व कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून घडल्या प्रकाराचा तीव्र निषेध केला.
महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज सुरू होताच शिवसेना नगरसेवक अभिजित चव्हाण व त्यांचा साथीदार महेश तांबे कार्यालयात गेले. त्यावेळी घरफाळा विभागाचे प्रमुख दिवाकर कारंडे व सहायक घरफाळा अधीक्षक विशाल सुगते हे चर्चा करत बसले होते. त्याचवेळी नगरसेवक चव्हाण व तांबे आत केबिनमध्ये घुसले.
जुन्या वाशी नाका येथील अमर सुधाकर पाटील यांच्या जागेतील सेटबॅकमधील केबिनना लावलेल्या घरफाळ्याबाबत चव्हाण हे सुगते यांना जाब विचारू लागले. ‘तू माझ्या प्रभागात मला विचारल्याशिवाय घरफाळा कसा काय लावलास?’ अशी थेट विचारणा त्यांनी केली. अचानक प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यामुळे दिवाकर कारंडे व विशाल सुगते यांनी ‘काही तक्रार असल्यास तशी लेखी द्या, मग पाहू काय करता येतंय ते’ असे समजावण्याच्या भाषेत सांगितले. परंतु, चव्हाण व तांबे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ‘जसा तू घरफाळा लावलास, तसाच तो रद्द कर’, अशा शब्दांत त्यांनी सुगते यांना सुनावले, तेव्हा सुगते यांनी ‘मला तसे करता येणार नाही, तुम्हाला लेखी तक्रार द्यावीच लागेल’ असे सांगितले. त्यावेळी शाब्दिक वाद झाला. त्यातून अभिजित चव्हाण व तांबे संतप्त होऊन (हॅलो पान ३ वर)
उपायुक्तांसह अधिकाऱ्यांकडून सुगतेंशी चर्चा
हल्ला झाल्यानंतर उपायुक्त विजय खोराटे, ज्ञानेश्वर ढेरे, सहायक आयुक्त सचिन खाडे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, आदींनी गांधी मैदान विभागीय कार्यालयास भेट देऊन घडल्या प्रकाराची माहिती घेतली व कार्यालयाची पाहणी केली. तसेच सुगते यांच्याशीही चर्चा केली. या सर्वांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद द्यावी, अशी सूचना केली. त्यानुसार सुगते यांनी पोलिसांत मारहाणीची तक्रार दाखल केली.
कोण आहेत
अभिजित चव्हाण ?
प्रभाग क्रमांक ८१ - क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथून महापालिकेवर विजयी झाले.
ताराराणी आघाडीकडून तिकीट मिळाले नाही, म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर लढले.
निवडून आल्यापासून गेल्या वर्षभरात पवडी, आरोग्य, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा छळ.
कळंबा फिल्टर हाऊस येथील आरोग्य खात्याच्या कार्यालयास त्यांनी टाळे ठोकले होते.
आरोग्य निरीक्षक, कर्मचाऱ्यांना वारंवार शिवीगाळ, धमकावण्याचे प्रकार त्यांच्याकडून घडले.
बोलावल्यानंतर लवकर आला नाही, म्हणून एका कर्मचाऱ्यास मारहाण केली होती.
चव्हाण यांच्या प्रभागात नोकरी नको, अशी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांना विनंती होत
असते.
संतप्त पडसाद
सुगते यांना मारहाण झाल्याची वार्ता महापालिका मुख्य कार्यालय, तसेच चारही विभागीय कार्यालयांत पसरली तेव्हा या घटनेचा निषेध म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने कामकाज बंद ठेवले. काही कर्मचारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात, तर बहुसंख्य कर्मचारी विठ्ठल रामजी शिंदे चौकात जमले. कामकाज बंद आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहायक आयुक्त सचिन खाडे, आदींनी दुपारी कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
सातत्याने घटना
महानगरपालिकेत गेल्या वर्षभरापासून अनेकवेळा कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करण्याचे प्रकार घडले आहेत. विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा जास्त उद्धार झाला. तत्कालीन सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनी महिला बालकल्याण सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया राबविली म्हणून त्यांना त्यांच्या कार्यालयात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून शिवीगाळ करून धमकाविण्यात आले होते. त्यावर त्यांनी राजीनामा देऊन नोकरीच सोडली. नगरसेवक राजेंद्र दिंडोर्ले यांनी व त्यांच्या बंधूने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाच मारहाण व शिवीगाळ केली होती. तर माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी सहायक आयुक्त सचिन खाडे यांना कोंडून घातले होते.
बेकायदेशीर केबिनना घरफाळा कसा लावता?
अभिजित चव्हाण यांचा सवाल : जाब विचारताना सुगते यांनीच मारहाण केल्याचा आरोप
कोल्हापूर : नवीन वाशी नाका येथील चिवा बाजारालगत अमर पाटील यांच्या सेटबॅक जागेत पाच केबिन लागल्या आहेत. बेकायदेशीर असलेल्या या केबिनना घरफाळा का लावला? याचा जाब मी विचारायला गेलो होतो; पण उलट विशाल सुगते यांनीच माझ्यावर व महेश तांबेवर हल्ला केला, असा आरोप नगरसेवक अभिजित चव्हाण यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला.
ज्या ठिकाणी घटना घडली, तेथे सीसीटीव्ही असून, त्याचे फुटेज पाहिल्यावर खरा प्रकार लक्षात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
जुन्या वाशी नाक्याजवळ असलेल्या चिव्यांच्या बाजारात अमर सुधाकर पाटील नावाच्या व्यक्तीची मिळकत आहे. त्यांनी सेटबॅक जागेत पाच केबिन बसविल्या असून, त्या भाड्याने दिल्या आहेत.
सेटबॅक जागेत कसलेही बांधकाम करता येत नाही, केबिन ठेवता येत नाहीत म्हणून मी पूर्वी विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याबाबत जागामालकांना नोटीसही देण्यात आली होती; परंतु कारवाई मात्र काहीच झाली नाही. आता तर त्या केबिनना घरफाळा लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. (हॅलो पान ३ वर)
प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न
दरम्यान, घटना घडल्यापासून हे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न सुरू होते. स्थायी सभापती मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, प्रा. जयंत पाटील, मधुकर रामाणे, इंद्रजित बोंद्रे, आदींनी रुग्णालयात जाऊन विशाल सुगते, तसेच कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश देसाई यांची भेट घेऊन फिर्याद देऊ नये, अशी विनंती केली; पण त्यांनी विनंती धुडकावून लावली. उलट त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणे पसंत केले. त्यानंतर नगरसेवक चव्हाण यांनी महेश तांबे यास उपचारासाठी सीपीआरमध्ये नेले. परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची तयारी त्यांनी सुरू केली; परंतु रात्री असा कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
आज निर्णय होणार : कर्मचारी संघटनेने नगरसेवक अभिजित चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत वाट पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी सांगितले.