२० लाखांची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकाराला रंगेहाथ पकडले आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई : सहकारी संस्थेच्या जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:58+5:302021-02-06T04:45:58+5:30

कोल्हापूर : अवसायनातील सहकारी संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी ४५ लाखांची मागणी करून त्यातील २० लाखांचा पहिला हप्ता ...

Assistant Town Planner caught red-handed while accepting bribe of Rs 20 lakh | २० लाखांची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकाराला रंगेहाथ पकडले आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई : सहकारी संस्थेच्या जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी लाच

२० लाखांची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकाराला रंगेहाथ पकडले आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई : सहकारी संस्थेच्या जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी लाच

Next

कोल्हापूर : अवसायनातील सहकारी संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी ४५ लाखांची मागणी करून त्यातील २० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक जिल्हाधिकारी सहजिल्हा निबंधक कार्यालयातील सहाय्यक रचनाकार (वर्ग दोनचे अधिकारी) गणेश हनमंत माने (रा. हरिओम नगर, रंकाळा परिसर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या वर्षातील राज्यातील ही सर्वात मोठी लाच स्वीकारतानाची कारवाई आहे. लाच घेतल्यानंतर माने याने मला का पकडले आहे, अशी विचारणा करून जणू मी त्या गावचाच नाही, असा आव आणला होता.

यातील तक्रारदार हे सूत गिरणीचे अध्यक्ष आहेत. ही संस्था शासनाने अवसायनात काढल्याने अवसायक यांनी सूत गिरणीची नोंदणी रद्द करावयाची असल्याने त्याकरिता संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. मालमत्तेचे मूल्यांकन लवकर करून दाखला‍ मिळावा, म्हणून तक्रारदार हे सहाय्यक रचनाकार गणेश माने याला वेळोवेळी भेटले होते. दिनांक २१ जानेवारी २०२१ला मालमत्तेचे मूल्यांकन करून दाखला देण्याची तक्रारदाराने विनंती केली. माने याने मूल्यांकन करून दाखला द्यायचा असेल तर ४५ लाख रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार अर्ज दिला व त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार संजू बंबर्गेकर, पोलीस हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, सुनील घोसाळकर, मयूर देसाई, चालक सुरज अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली.

असा ठरला व्यवहार..

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील माने याच्या लाच मागणीची पडताळणी २१ जानेवारी व १ फेब्रुवारीला पंच साक्षीदारांच्या समक्ष करण्यात आली. या पडताळणीमध्ये मालमत्तेचे शासकीय मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी ४५ लाख रूपये लाचेची मागणी माने याने करून पहिला हप्ता २० लाख रूपये घेऊन येण्यास सांगितले तर उर्वरित २५ लाख रूपये दाखला देताना घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

टपरीवर पैसे घेताना जाळ्यात...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला असता, तक्रारदार व गणेश माने हे दोघेजण कार्यालयातून बाहेर पडून आवारातील चहाच्या टपरीवर गेले व त्याठिकाणी तक्रारदाराकडून २० लाख रूपये लाच स्वीकारताना पथकाने माने याला रंगेहाथ पकडले.

फोटो : ०५०२२०२१-कोल-गणेश माने-लाच आरोपी

Web Title: Assistant Town Planner caught red-handed while accepting bribe of Rs 20 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.