सहायक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अव्वल :अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक : कसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:20 PM2019-05-27T21:20:46+5:302019-05-27T21:21:07+5:30
चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद जिद्द, कष्ट आणि अभ्यासातील सातत्य हेच माझ्या यशाचे गमक आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या वन विभागात काम करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. - लक्ष्मण कसेकर
संतोष मिठारी ।
राज्य वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता.आजरा) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात अव्वलस्थान पटकावले. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील या युवकाने मिळविलेल्या यशाने कोल्हापूरचा ठसा राज्यपातळीवर उमटला आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण याच्याशी साधलेला थेट संवाद.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेत करिअर करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
उत्तर : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माझा करिअरबाबतचा कल माझे मोठे भाऊ रामचंद्र आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक पांडुरंग शिपूरकर यांनी जाणला. त्यांनी मला स्पर्धा परीक्षा हा करिअरसाठी उत्कृष्ट पर्याय असल्याचे सांगितले. आजरा परिसरातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी या परीक्षांमध्ये यश संपादन करीत होते. ते पाहून आपणही या परीक्षांमध्ये यश मिळवू शकतो, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला.
प्रश्न : या परीक्षेचे स्वरूप कसे आहे?
उत्तर : राज्य वनसेवा परीक्षा ही ‘एमपीएससी’च्यावतीने घेतली जाते. या परीक्षेचे पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. पूर्व परीक्षा शंभर गुणांची असते. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, चालू घडामोडी आणि आकलन क्षमता या विषयांचा समावेश असतो. मुख्य परीक्षा चारशे गुणांची असते. त्यामध्ये सामान्य अध्ययन आणि जनरल सायन्स अँड नेचर काँझर्वेशन असे दोन पेपर असतात. ५० गुणांसाठी मुलाखत असून, त्यामध्ये व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते.या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सहायक वनसंरक्षक (गट अ), वनक्षेत्रपाल (गट ब) या पदांवर काम करण्याची संधी मिळते.
प्रश्न : वनसेवा परीक्षेची तयारी कशी केली?
उत्तर : आजरा महाविद्यालयातून बी.एस्सी. अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मी नियमितपणे रोज सात ते आठ तास अभ्यास केला. राज्य वनसेवा परीक्षेत यश मिळवू शकलो. मुंबईतील ‘एसआयएसी’, पुणे येथील ‘यशदा’ आणि कोल्हापूरमधील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर या संस्थांमध्ये मार्गदर्शन घेतले. माझ्या यशात आई, वडील, भाऊ, वहिनी यांच्यासह शिक्षक पांडुरंग शिपूरकर, दीपक अतिग्रे यांचा मोलाचा वाटा आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमी
लक्ष्मण याच्या कुटुंबाची दोन एकर शेती आहे. वडील शेती करतात. आई गृहिणी आहे. भाऊ रामचंद्र यांची ‘एमपीएससी’च्यावतीने करसहायकपदी निवड झाली आहे. लक्ष्मण याचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर देवर्डेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण आजरा हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. दहावीत त्याने ९३.६९ टक्के गुणांसह, तर बारावीमध्ये ८५ टक्के गुणांसह आजरा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. ९१.६८ टक्के गुणांसह त्याने बी.एस्सी.ची पदवी घेतली. त्याला पदवीच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारची इन्सपायर स्कॉलरशिप मिळाली होती. .