माऊलीच्या अंत्यसंस्काराला केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:31+5:302021-04-20T04:26:31+5:30
पेठवडगाव : एका हलाकीच्या परिस्थितीतील वृध्देचे निधन झाले होते. सामाजिक बांधिलकीतून पुढे येत पालिका कर्मचाऱ्यांनी पुढाकार ...
पेठवडगाव : एका हलाकीच्या परिस्थितीतील वृध्देचे निधन झाले होते. सामाजिक बांधिलकीतून पुढे येत पालिका कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सुशिला महादेव पारगावकर (वय ७० ) असे त्यांचे नाव आहे.
सोमवार (दि. १९) शहरात सर्वत्र कोरोनाचे वाढते रुग्ण मिळून येत होते. या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचारी युद्धपातळीवर कामांमध्ये व्यस्त होते. याचवेळी हलाकीच्या परिस्थितीत जगण्यासाठीचा संघर्ष करणाऱ्या सुशिला यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेस प्राप्त झाली. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी घरासमोरच पडल्याने तिचा पाय दुखावला होता. तिचा मुलगा राजू तोकड्या उत्पन्नातून तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिच्या अंत्यसंस्काराचा भार कुटुंबाने पेलण्याऐवजी पालिकेनेच पुढाकार घेत कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करणाचा निर्णय घेतला. त्यामुळे कीट परिधान केले अन् त्या महिलेचा मृतदेह घराबाहेर आणून रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आला.
यावेळी शिवाजी सलगर, संदीप धनवडे, संतोष सणगर, सतीश माळवदे यांनी यासाठी पुढाकार घेतला. पालिका कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी 'माणुसकी अजूनही जिवंत आहे’, याचा संदेश कृतीतून दिला आहे.