आर्किटेक्चर, इंजिनिअर्स असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:11+5:302021-08-24T04:29:11+5:30
कोल्हापूर गेल्या ५० वर्षात आर्किटेक्चर ...
कोल्हापूर गेल्या ५० वर्षात आर्किटेक्चर असोसिएशनने केवळ व्यावसायिक भूमिका न घेता सामाजिक बांधिलकी जोपासली, असे प्रशंसाेद्गार जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काढले. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनी ते बोलत होते.
दीपप्रज्वलनानंतर आर. एस. बेरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेच्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्याचेही सादरीकरण करण्यात आले. अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. कोल्हापूरच्या स्वच्छतेपासून ते महापुराच्या काळातही संस्थेने केलेल्या कामाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून कोल्हापूरच्या विकासात याहीपुढे योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे माजी पदाधिकारी प्रमोद बेरी, विलास भोसले, जी. आर. डिगे, पी. पी. खरे, बलराम महाजन, जयसिंग मोरे, एच. डी. सरनाईक, मोहन वायचळ, रमेश पोवार यांच्यासह प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सचिव राज डोंगळे उपस्थित होते.