अवकाशशास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:02 PM2020-06-14T17:02:54+5:302020-06-14T17:08:21+5:30
कोल्हापूर येथील जेष्ठ अवकाशशास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले यांचे रविवारी सकाळी निधन झाले.
कोल्हापूर : भारतीय बनावटीच्या पहिल्या रेडिओ दुर्बिणीचे जनक आणि ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ राजाराम विष्णू तथा आर. व्ही. भोसले यांचे रविवारी दुपारी एकच्या सुमारास टाकाळा येथील महागावकर कॉम्पलेक्समधील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षीय होते.
दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी विजयमाला, मुली अरूणा, आरती, जावई, नातंवडे असा परिवार आहे.
भुदरगड तालुक्यातील सोनाळी येथे डॉ. भोसले यांचा जन्म झाला. बस्तवडे (ता. कागल) त्यांचे मूळ गाव. कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. सन १९४५ मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी राजाराम महाविद्यालयातून बी. एस्सी. चे शिक्षण घेतले.
पुणे येथील एस. पी. महाविद्यालयातून त्यांनी एम. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते अहमदाबाद येथे डॉ. विक्रम साराभाई यांच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे सशोधन सहायक म्हणून रुजू झाले. डॉ. भोसले यांनी सन १९६० मध्ये गुजरात विद्यापीठातून पीएच. डी. पदवी संपादित केली. पीएच. डी. साठीच्या संशोधनावेळी त्यांनी भारतीय बनावटीच्या पहिल्या रेडिओ दुर्बिणी बनविली. पुढे १९६१ मध्ये ते उच्चशिक्षणासाठी ते कॅनडाला रवाना झाले.
अहमदाबाद येथील प्रिमियर रिसर्च लॅबोरेटरीमध्ये त्यांनी डॉ. विक्रम साराभाई, के. आर, रंगनाथन, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, डॉ. यु. आर. राव या दिग्गजांसमवेत त्यांनी काम केले. या लॅबोरेटरीमधून ते १९८८ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात कार्यरत होते. त्यांनी याठिकाणी अवकाश संशोधन अभ्यासक्रम सुरू केला.
विद्यापीठाचे पन्हाळागडावर अवकाश संशोधन केंद्र सुरू करण्यात त्यांनी योगदान दिले. प्रयोगशाळा, वेधशाळा सुरू केली.
विविध संस्थांमध्ये कार्यरत
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव , पंचगंगा प्रदूषण, रंकाळा तलाव संवर्धनासाठी त्यांनी काम केले. नांदी पर्यावरण समृद्धीची या उपक्रमाला त्यांचे लाभले. मित्र, विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र, मराठी विज्ञानपरिषद आदी संस्थांमध्ये ते कार्यरत होते. त्यांना इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशीप मिळाली होती.
इंडियन फिजिक्स असोसिएशनचे ते आजीव सदस्य होते. त्यांना कोल्हापूर महानगर पालिकेने सन २००४ मध्ये कोल्हापूर भूषण पुरस्काराने, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने सन २०१५ मध्ये डी. लिट. पदवीने सन्मानित केले होते.