बानगेत ७० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतीसाहित्याचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 04:44 PM2023-01-29T16:44:26+5:302023-01-29T16:44:59+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ताुलक्यातील बानगेत ७० एकरातील ऊस जळून खाक झाला.
दत्ता पाटील
बानगे (कोल्हापूर) : येथील इनाम, सोनारकी पड ते गुजर यांचा शेतापर्यंत असणाऱ्या क्षेत्रात लागलेल्या आगीत सुमारे ७० एकराहून अधिक क्षेञातील ऊस जळून खाक झाला. यामध्ये ऊसासह पाईप, ठिबक सिंचन व इतर साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याअभावी या परिसरातील ऊस पडून आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही या रस्त्यासाठी प्रयत्न केले. माञ, तोडगा न निघाल्याने रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याच विभागात ४००एकराहून अधिक ऊस शिल्लक आहे. येथिल शेतकरी आणि तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आली.
या ठिकाणी बिद्री व हमिदवाडा कारखान्याचा अग्नीशामक बंबही दाखल झाला होता.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. यामध्ये महादेव धोंडी पाटील, निलेश पाटील, अशोक सावंत, तुकाराम सावंत, चंद्रकांत पाटील, भगतसिंग पाटील, प्रकाश पाटील-बंदूके, धनाजी शामराव पाटील, रामदास पाटील, तानाजी पाटील, विष्णू सावंत, बाबूराव पाटील यासह जवळपास ६०हून अधिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.
चार जनावरे बचावली...
आग लागलेल्या ऊसक्षेञानजीकच आंनदी जाधव यांचा चार जनावरांचा गोठा आहे.प्रसंगावधानता बाळगत सरपंच युवराज पाटील व सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी आपल्या मालकीचा बोअरवेल सुरू करून या गोठयासभोवती पाणी मारले तसेच, या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविले. यासाठी योगेश जमनिक,भगवान पाटील,शरद पाटील यांनीही परिश्रम घेतले.