शिये येथे बिबट्याने रेडकू फाडून खाल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 06:38 PM2023-04-06T18:38:55+5:302023-04-06T18:39:02+5:30
शिये (तालुका करवीर) येथे बिबट्याने बुधवारी (दि.५) रोजी रात्री बुगले मळा येथील संजय मगदूम या शेतकऱ्याची रेडीवर हल्ला करून अक्षरशः फाडून खाल्ली.
सतिश पाटील, शिरोली :
शिये (तालुका करवीर) येथे बिबट्याने बुधवारी (दि.५) रोजी रात्री बुगले मळा येथील संजय मगदूम या शेतकऱ्याची रेडीवर हल्ला करून अक्षरशः फाडून खाल्ली.
तासगाव मध्ये बिबट्याला जेरबंद केले तर शियेत बिबट्या मोकाट फिरत आहे. याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
गेल्याच आठवड्यात २६ मार्चला रात्री आठच्या सुमारास बिबट्या जठारवाडी हद्दीतून शिये गावच्या हद्दीत मोटरसायकल समोरुनच धूम ठोकून गेला होता. यावेळी मोटारसायकल चालकाने ब्रेक दाबल्याने बिबट्या निसटून गेला अन्यथा बिबट्या गाडीला धडकत होता.
गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या सादळे मादळे, शिये, कासारवाडी, गिरोली, जठारवाडी, भुये या परिसरातील जंगलात वास्तव्यास आहे.
बुधवारी रात्री शिये येथील बुगले मळ्यातील संजय मगदूम या शेतकऱ्याच्या रेडीवर हल्ला करून अक्षरशः फाडून खाल्ली.
हा बिबट्या कामावरून घरी जाणाऱ्या लोकांना, प्रवाशांना, शेतकऱ्यांना दिसतो, बिबट्याचा जरी अधिवास नसला तरी हा जंगल परिसर आहे. याठिकाणी घनदाट झाडी आहे. विसावा घ्यायला आणि लपायला डोंगर असल्याने मोठे दगड आहेत. रानडूक्कर, मोर, लांडोर, भटकी कुत्री असे मुबलक जंगली प्राण्यांचे खाद्य बिबट्याला मिळते. पाण्याची सोय आहे स्वच्छंद फिरायला जागा आहे कुणाचा त्रास नाही यामुळे या भागात बिबट्याने आपला मुक्काम केला आहे. तो जंगल अधिवासात जातच नाही. पण यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी पाजण्यासाठी जाणारे शेतकरी, प्रवासी, कर्मचारी यांना धोका होवू शकतो.
तासगाव मध्ये बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले तर शियेत मात्र बिबट्या मोकाट फिरत आहे. याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करत आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून शिये परिसरात बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याने बुधवारी म्हैसीच्या रेडकावर हल्ला करून त्याला ठार मारले. वनविभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.
माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना