Atal Bihari Vajpayee : कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 06:58 PM2018-08-16T18:58:50+5:302018-08-16T19:00:17+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कोल्हापुरातील आठवणींना येथील संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी उजाळा दिला. अटलजी कोल्हापुरात १९७0 पासून १९९७ पर्यंत अनेकवेळा विविध कामानिमित्त आले होते. पंतप्रधान होण्याआधी एक वर्ष त्यांनी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांसोबत भोजनही घेतल्याच्या आठवणी अनेकजणांनी सांगितल्या
संदीप आडनाईक
कोल्हापूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कोल्हापुरातील आठवणींना येथील संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी उजाळा दिला. अटलजी कोल्हापुरात १९७0 पासून १९९७ पर्यंत अनेकवेळा विविध कामानिमित्त आले होते. पंतप्रधान होण्याआधी एक वर्ष त्यांनी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांसोबत भोजनही घेतल्याच्या आठवणी अनेकजणांनी सांगितल्या.
जनसंघाच्या सामाजिक समरसता परिषदेच्या निमित्ताने वाजपेयी सर्वप्रथम १९७0 मध्ये सर्वप्रथम कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरातील राजमाता जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात ही परिषद झाली होती. त्यावेळी जनसंघाचे तत्कालीन नेते गोपाळराव माने, वि. ना. सांगलीकर, बाबूराव जोशी, विजया शिंदे, अनंत फडके कार्यरत होते. तेव्हा शेतकरी कामगार पक्ष येथील बलाढ्य पक्ष होता. काँग्रेसची अवस्था केविलवाणी होती.
बहुजन समाजाला संघाच्या कार्यात आणण्यासाठी सामाजिक समरसता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून वाजपेयी कोल्हापुरात आले होते. या परिषदेला डाव्या संघटनांनी विरोध केल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. वाजपेयी यांनी केलेल्या भाषणाच्या आठवणी संघाचे स्वयंसेवक माधव ठाकूर यांनी सांगितल्या. या परिषदेच्या निमित्ताने खासबाग मैदानाजवळ सायंकाळी जाहीर सभाही झाली होती. आताच्या खाऊ गल्लीच्या जागेत झालेल्या या सभेला तेव्हाही लोकांनी प्रतिसाद दिला होता.
या सभेचे स्वागत गीत सुुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ऊर्फ नाना यांनी लिहिले होते.
याची आठवण ठाकूर यांनी सांगितली. नाना तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. जनसंघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव भागवत यांना घेऊन ठाकूर नानांच्या घाटी दरवाजा येथील घरी गेले व सायंकाळच्या सभेसाठी गीत हवे असल्याचे सांगितले. प्रतिभावान नानांनी बसल्या बैठकीतच स्वागत गीत लिहून दिले. प्रत्यक्ष सभेत भागवत यांनी ही माहिती वाजपेयींना दिली, तेव्हा वाजपेयी यांनी भर सभेत खेबुडकरांना अतिशीघ्र कवी म्हणून कौतुकाची शाबासकी दिली. एका कवीने दुसऱ्या कवीला दिलेली ही दाद होती.
वाजपेयी जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येत, तेव्हा तेव्हा ते गादी कारखानदार य. ह. जोशी आणि वि. ना. सांगलीकर यांच्या घरी उतरत, अशा आठवणी जोशी आणि सांगलीकर परिवाराने आवर्जुन सांगितल्या.
अंबाबाई, रंकाळ्याशीही जडला ऋणानुबंध
अटलबिहारी वाजपेयी १९७९ मध्ये जेव्हा जनता पक्षाच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते, तेव्हा कोल्हापुरात आले होते. कर्नल शंकरराव निकम यांनी त्यांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या दौऱ्यात कोल्हापूरसह इचलकरंजी आणि सांगली येथे सभा झाल्या होत्या. यावेळी वाजपेयी यांच्यासोबत दोन दिवसांचा सहवास माधव ठाकूर यांना लाभला होता. यावेळी वाजपेयी शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते. तेथे रंकाळ्याचे तैलचित्र होते.
वाजपेयींना त्यातील संध्यामठाबद्दल औत्सुक्य वाटले. दुसऱ्यां दिवशी सकाळी आठ वाजता विमानाने ते परत जाणार होते; परंतु अंबाबाईचे दर्शन आणि संध्यामठ पाहूनच परतण्याचा निर्धार त्यांनी केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी दहा मिनिटे त्यांनी अंबाबाईची महती सांगितली.
त्यानंतर थेट त्यांनी रंकाळा गाठला. ही माहिती समजताच तत्कालीन आमदार श्रीपतराव बोंद्रे तेथे आले. त्यांना वाजपेयी यांनी संध्यामठाबद्दल विचारणा केली. दादांनी पूर्वापार हे नाव पडल्याचे सांगताच वाजपेयींनी हे शंकराचे मंदिर आहे. तेथे त्रिकाल संध्या होत असल्यामुळे हे नाव पडले असावे, असे सांगितले. यानंतर दादांनी त्यांना घरी येण्याची विनंती केली; परंतु वेळ नसल्याचे सांगून दादांनी कासांडी भरून आणलेले दूध तिथेच प्राशन केले.
चव्हाणवाड्यात मुक्काम
वाजपेयी आणि य. ह. जोशी, तसेच वि. ना. सांगलीकर यांच्याशी घरोबा होता. गादी कारखान्याचे मालक य. ह. जोशी हे भवानी मंडपातील नृसिंह निवास येथे चव्हाणवाड्यात राहत. ते जनसंघाचे कार्यकर्ते. वाजपेयी १९७0 नंतर कोल्हापुरात आले, तेव्हा मुक्कामी आल्याची आठवण जोशी यांचे चिरंजीव सुधीर जोशी यांनी सांगितली. ते तेव्हा पाच वर्षांचे होते. जनसंघाचे संस्थापक वि. ना. सांगलीकर यांच्या कुटुंबीयांशीही त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्याही घरी वाजपेयी यांनी ते खासदार असताना मुक्काम केला होता.
कार्यकर्त्यांसोबत भोजन
१९९७ मध्ये पंतप्रधान होण्याच्या एक वर्षापूर्वी अटलबिहारी वाजपेयी कोल्हापुरात आले होते. बाबूराव जोशी यांच्या प्रतिभानगर येथील मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत त्यांनी भोजन घेतल्याची आठवण कार्यकर्त्यांनी सांगितली.