अटल चषक फुटबॉल स्पर्धा : ‘फुलेवाडी’ने ‘प्रॅक्टिस’ला बरोबरीत रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:03 AM2019-02-25T11:03:11+5:302019-02-25T11:04:16+5:30
अटीतटीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ ला १-१ असे बरोबरीत रोखले.
कोल्हापूर : अटीतटीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ ला १-१ असे बरोबरीत रोखले.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी या दोन तुल्यबळ संघात साखळी फेरीतील सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘प्रॅक्टिस’कडून डेव्हीड ओपेरा, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले, कैलास पाटील, सागर चिले यांनी फुलेवाडी च्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली.
त्यात ४ थ्या मिनिटास ‘प्रॅक्टिस’कडून पीटर सीनने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ‘फुलेवाडी’कडून संकेत वेसणेकर, संकेत साळोखे, अरबाज पेंढारी, रोहित मंडलिक, मंगेश दिवसे, अक्षय मंडलिक यांनीही तितक्याच जोरदारपणे आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. १६ व्या मिनिटाला ‘फुलेवाडी’कडून संकेत वेसणेकर याने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाला १-१ असे बरोबरीत आणले.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी एकमेकांवर आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. ‘प्रॅक्टिस’कडून डेव्हीड ओपेरा, कैलास पाटील, इंद्रजित चौगुले यांनी आक्रमणाची धार वाढवीत फुलेवाडी संघावर आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला; मात्र, सजग गोलरक्षक जिगर राठोडने त्यांचे गोल करण्याचे मनसुबे उधळून लावले.
सामन्याच्या जादा वेळेत फुलेवाडी संघाच्या गोलक्षेत्रात अरबाज पेंढारीने चेंडू अवैधरीत्या हाताळला. त्याबद्दल मुख्य पंच सुनील पोवार यांनी ‘प्रॅक्टिस’ संघास पेनल्टी बहाल केली. त्यावर गोल करून ‘प्रॅक्टिस’ संघ आघाडी घेईल व विजयी होईल, असा कयास फुटबॉलप्रेमींना होता; मात्र, प्रत्यक्षात ‘प्रॅक्टिस’च्या डेव्हीड ओपेराने मारलेला फटका फुलेवाडीचा गोलरक्षक जिगर राठोडने डावीकडे झेपावत बाहेर काढला; त्यामुळे आयत्याच गोल करण्याच्या संधीसह ‘प्रॅक्टिस क्लब’ विजयापासून दूर राहिला; त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत राहिला.