‘एटीएम’; एनी टाईम पैशाची लूट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:42 AM2017-08-03T00:42:16+5:302017-08-03T00:42:16+5:30
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एटीएम मशीन फोडून लाखो रुपये लंपास करण्याच्या घटना बँक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांच्या एटीएम सेंटरवरून ५० लाखांच्या लुटीनंतरही एटीएम सुरक्षेबाबत बँका सुस्तच आहेत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी सर्व बँकांनी एटीएम सेंटरसह बँकेच्या शाखांमध्येही हत्यारधारक सुरक्षारक्षकासह सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी यापूर्वी दिल्या आहेत; परंतु बँक प्रशासन आणि एटीएम मशीन पुरविणारी कंपनी यांच्यातील वादामुळे अशा गंभीर घटना घडतच आहेत.
भुदरगड येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन तोडून त्यातील २५ लाख रुपयांची जबरी चोरी झाली होती. या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात एटीएम सेंटरच्या सुरक्षेबाबत, तसेच त्यामध्ये भरण्यात येणाºया पैशांबाबत कोणत्याच प्रकारे सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक पोलीस मुख्यालयात घेतली. सुरक्षेसंदर्भात सीसीटीव्ही व शस्त्रधारक सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना केल्या. त्यामध्ये कोणी हलगर्जीपणा केल्यास चोरी झाल्यानंतर संबंधित बँक प्रशासनास जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यांच्या या सूचनेची काही बँकांनी अंमलबजावणी केली; परंतु आजही अनेक बँका व एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत.
त्यामुळे एटीएम मशीन चोरीच्या घटना घडत आहेत. सुरक्षारक्षक नसल्याचा गैरफायदा घेत दरोडेखोरांनी मुक्त सैनिक वसाहत येथील एटीएम सेंटरवर दरोडा टाकून साडेआठ लाख रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.२) घडली. त्यामुळे जिल्ह्यातील बँका व एटीएम सेंटरची सुरक्षा धोक्यात आली आहे.
याठिकाणी एटीएम सेंटरमध्ये झाली चोरी
भुदरगड येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन तोडून २५ लाख रुपयांची जबरी चोरी.
संभाजीनगर ते कळंबा रस्त्यावरील तपोवन हायस्कूलसमोरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून जरी ११ हजार ५०० रुपये लंपास केले होते. मोठी रक्कम सुदैवाने वाचली होती.
लक्ष्मीपुरीतील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेच्या एटीएम सेंटरमधून सहा लाख ४६ हजार रुपये लंपास केले होते.
मुक्त सैनिक वसाहत येथील एटीएम सेंटरवर चोरी करून साडेआठ लाख रुपये लंपास केले.
पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम, संभाजीनगर येथील बँक आॅफ बडोदा बँकेचे एटीएम, शाहूपुरी दुसºया गल्लीतील स्टेट बँक आॅफ म्हैसूर या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
बँकांनी घ्यावयाची दक्षता
एटीएम सेंटरचे आतील व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.
सीसीटीव्हीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग १८० दिवस जतन करून ठेवावे.
एटीएम सेंटरमध्ये २४ तास हत्यारधारी सुरक्षारक्षक नेमण्यात यावा.
एटीएम सेंटरमध्ये अलार्म सिस्टीम बसविण्यात यावी.
बँकेतून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी घेऊन जात
असताना कॅश वाहनाचा वापर करावा व वाहनामध्ये कमीत कमी एक हत्यारधारी सुरक्षारक्षक बरोबर ठेवावा.
बँकेच्या शाखेमध्येही २४ तपास हत्यारधारी सुरक्षा रक्षक नेमावेत.
बँकेमध्ये आतील व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे.
स्ट्राँगरूमजवळ सकृतदर्शनी दिसणार नाही, अशी
अलार्म सिस्टीम बसविण्यात यावी.