एटीएम ‘आऊट आॅफ आॅर्डर’

By admin | Published: May 16, 2017 01:21 AM2017-05-16T01:21:21+5:302017-05-16T01:21:21+5:30

‘रॅन्समवेअर’ची भीती : अपुऱ्या चलन पुरवठ्याबरोबर आता व्हायरसचे कारण

ATM 'Out of Order' | एटीएम ‘आऊट आॅफ आॅर्डर’

एटीएम ‘आऊट आॅफ आॅर्डर’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अपुऱ्या चलन पुरवठ्याबरोबरच ‘रॅन्समवेअर’ या व्हायरसच्या भीतीमुळे सोमवारी कोल्हापूरमधील बहुतांश ‘एटीएम’ मशीन बंद होती. एटीम मशीनच्या बाहेर ‘एटीएम आऊट आॅफ आॅर्डर’ असे बोर्ड लटकलेले होते. बहुतांश एटीएममध्ये हे चित्र दिसून आले. यामुळे पैसे काढण्यासाठी ग्राहकांना अनेक ठिकाणी शोधाशोध करावी लागली.
जिल्ह्यात विविध ३३ बँकांच्या ५८८ शाखा आणि ५७५ एटीएम कार्यान्वित आहेत. या बँकांना दैनंदिन व्यवहारासह एटीएमकरिता आवश्यक चलनापेक्षा कमी पुरवठा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून होत आहे. त्यामुळे महिन्यातील काही दिवस बँकांना आपली अधिकतर एटीएम बंद ठेवावी लागत आहेत. जी काही एटीएम सुरू आहेत. त्याठिकाणी इतर बँकांच्या ग्राहकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे तेथील पैसे काही तासांच संपत असल्याने ‘कॅश संपली आहे’, ‘आऊट आॅफ कॅश’, अशा स्वरुपातील फलक झळकत आहेत. पैसे उपलब्ध असणाऱ्या एटीएमसाठी ग्राहकांना शोधाशोध करावी लागत आहे. सायंकाळी पाचनंतर अशा एटीएमच्या आवारात गर्दी वाढली होती.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलादेखील दैनंदिन व्यवहारांसाठी पुरेसे चलन उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, एटीएम बंदबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आरबीआयकडून पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याचे कारण त्यांनी सांगितले शिवाय पुरेसे चलन मिळविण्यासाठी बँकांचा करेन्सी चेस्ट आणि वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून रोज आरबीआयकडे पाठपुरावा सुरू आहे. एटीएममध्ये चलन उपलब्ध नसले, तरी बँकेतून पैसे देण्याची मर्यादा कमी केली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.


नोकरदारांची अडचण
सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नोकरी करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. दिवसभर कामावर असल्याने बँकांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी एटीएमचा आधार आहे. मात्र, चलन टंचाई, व व्हायरसच्या धोक्याने अधिकतर एटीएम बंद असल्याने मोठी अडचण येत आहे.

‘व्हायरस’ची भीती
रॅन्समवेअर या व्हायरसच्या भीतीमुळे काही बँकांनी त्यांची एटीएम सोमवारी बंद ठेवली होती. संबंधित व्हायरसच्या माध्यमातून सायबर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करत नेट बँकिंग, डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्यात येऊ नयेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणखी दोन दिवस काही एटीएम बंद राहणार आहे, अशा स्वरुपातील संदेश व्हॉटसअपच्या माध्यमातून दिवसभर फिरत होते. या स्वरुपातील संदेश आणि व्हायरसच्या भीतीपोटी अनेकांनी आॅनलाईन पद्धतीने व्यवहार करणे टाळले.

Web Title: ATM 'Out of Order'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.