रूकडी-कोल्हापूर लोहमार्गावरून आत्मक्लेष पदयात्रा: रेल्वे पोलिसांची दडपशाही, आंदोलकांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 06:52 PM2023-10-11T18:52:34+5:302023-10-11T18:53:19+5:30
रूकडी रेल्वे प्रवासी व ग्रामस्थांच्यातून संताप
रूकडी /माणगाव: महालक्ष्मी, कोयना, महाराष्ट्र, सह्याद्री एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना पूर्वीप्रमाणे थांबा मिळाव्यात तसेच सांगली व कोल्हापूर येथे असणाऱ्या रेल्वे समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रूकडी ते कोल्हापूर लोहमार्गावरून आत्मक्लेष पदयात्रा रूकडी येथून सुरू होताच रेल्वे पोलिसांनी आंदोलकांना अटकाव करत ताब्यात घेतले. पदयाञेत सामील होण्याऱ्या प्रवाशांची धरपकड करत आंदोलन दडपशाहीने मोडीत काढले.
रेल्वे पोलिसांच्या या दंडूकशाहीविरोधात रूकडी परिसरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रूकडी ग्रामस्थांनी रूकडी बंद ठेवून आंदोलनास पाठींबा दिला. सामाजिक कार्यकर्ते अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.
एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना पूर्वीप्रमाणे थांबा मिळाव्यात, रेल्वे भूयारी मार्गाचे गलथान काम व गैरसोयीमुळे नागरिकांना होणारा पश्चाताप, सांगली ते कोल्हापूर दरम्यान असणाऱ्या स्थानकावर अतिरिक्त पॅसेंजर गाड्या सोडण्यात याव्यात, प्रवासासाठी तिकीट दर कमी करण्यात यावे, हातकणंगले, माणगाववाडी, रुकडी भुयारी मार्ग मध्ये असणाऱ्या समस्यांचे निराकरण करावे. तसेच रुकडी रेल्वे स्थानकास ऐतिहासिक वारसा असून त्याचा विकास व्हावा यासाठी वारंवार निवेदन देवून, रेल्वे बंद आंदोलन करून ही रेल्वे विभाग कोणतेही प्रश्न मार्गी लावत नाही. या निषेधार्थ व आदी. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ही आत्मक्लेश लोहमार्ग पदयाञा काढण्यात आली.
दरम्यान, पदयाञा सुरू होण्यापूर्वीच मोठा पोलीस फौजफाटा रूकडी रेल्वे स्थानकावर तैनात होता. पदयाञा सुरू होताच पोलिसांना प्रवाशांची धरपकड करत पदयाञा मोडीत काढली. जमलेल्या काही आंदोलकांना रेल्वे पोलिसांनी घेराव घालून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे ही कृती पाहून प्रवासी नागरीक खासगी वाहने व बसने मार्गस्थ झाले. रेल्वे विभागाने दखल न घेतल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला.