corona virus : आदेशाचा घोळ; शाळा बंदचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 01:03 PM2022-01-11T13:03:49+5:302022-01-11T13:05:17+5:30

प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळाला नसल्याने काही शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

An atmosphere of confusion prevailed in some schools due to non-receipt of written orders from the Department of Primary and Secondary Education | corona virus : आदेशाचा घोळ; शाळा बंदचा गोंधळ

corona virus : आदेशाचा घोळ; शाळा बंदचा गोंधळ

googlenewsNext

कोल्हापूर : वाढत्या कोरोना, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दि. १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. त्याबाबत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळाला नसल्याने काही शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

या विभागाचा आदेश मिळाला नसल्याने सोमवारी काही शाळांमध्ये विद्यार्थी आले. त्यांना ऑफलाईन वर्ग बंद होऊन ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्याची सूचना देऊन घरी पाठविण्यात आले. माध्यमिक शिक्षण विभागाकडून दुपारी दोननंतर शाळांना लेखी आदेश मिळाला. बहुतांश शाळांनी दहावी, बारावीचे वर्ग कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने शाळा बंदचा निर्णय शनिवारी जाहीर केला. त्यावर जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री नऊनंतर आदेश काढला. त्याची माहिती व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, शाळा बंदबाबतचा लेखी आदेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना याअनुषंगाने सूचना देण्याचा निर्णय शहर, जिल्ह्यातील काही शाळांनी घेतला. अशा शाळांमध्ये सोमवारी सकाळी विद्यार्थी आले. आदेश मिळेपर्यंत काही शाळांमध्ये या विद्यार्थ्यांचे तास घेण्यात आले. त्यांना ऑनलाईन शिक्षणाबाबतच्या सूचना देऊन घरी पाठविण्यात आले.

इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू राहिल्या. इतर संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना शाळेत येऊ नये याबाबत रविवारी रात्री सूचना केल्या. त्यामुळे या शाळांमध्ये केवळ शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

दुपारी दोननंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळाल्यानंतर शाळा व्यवस्थापनांनी त्यांचे विद्यार्थी आणि पालकांना दि. १५ फेब्रुवारीपर्यंत ऑफलाईन वर्ग बंद राहणार असून ऑनलाईन शिक्षण दिले जाणार असल्याबाबतचे संदेश व्हॉट्सॲप आणि टेक्स्ट मेसेजद्वारे पाठविले. प्राथमिक शिक्षण विभागाचा आदेश सायंकाळी पाचच्या सुमारास शाळांना मिळाला.

आदेश नसल्याने संभ्रम

शासन, जिल्हा प्रशासनाने शाळा बंदचा आदेश काढल्यानंतर त्याची माहिती शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा, मुख्याध्यापकांना त्वरित देणे आवश्यक होते. शाळा बंदबाबतचा लेखी आदेश शिक्षण विभागाकडून वेळेत मिळाला नसल्याने शाळांमध्ये गोंधळाचे, तर विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. काही शाळेत विद्यार्थ्यांना यावे लागले. शिक्षण विभागाकडून वेळेत आदेश मिळावेत, अशी प्रतिक्रिया शिक्षक सेनेचे जिल्हा नेते संतोष आयरे यांनी व्यक्त केली.

'अशा' विद्यार्थ्यांसाठी समूह अध्यापन

ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्राइड मोबाइल अथवा इतर कोणतेही माध्यम उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांसाठी समूह अध्यापन, शिक्षण आपल्या दारी, गृहभेटी आदी उपक्रम राबवून त्यांना शिक्षण द्यावे. शिष्यवृत्ती परीक्षांच्या अध्यापनात खंड पडू देऊ नये, अशी सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे.

प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाच्या सूचना

- इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे.

- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत शंभर टक्के उपस्थित राहून प्रशासकीय कामकाज, परीक्षाविषयक कामकाज करायचे आहे.

- शिक्षण विभागाने सूचित केलेले किंवा परवानगी दिलेले उपक्रम राबविणे

- वय वर्षे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना केवळ लसीकरणासाठी शाळा, महाविद्यालयात येण्यास परवानगी राहील.

- इयत्ता दहावी, बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय मंडळाच्या परीक्षांविषयक कामकाजासाठी उपस्थित राहण्यास मुभा राहील.

Web Title: An atmosphere of confusion prevailed in some schools due to non-receipt of written orders from the Department of Primary and Secondary Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.