शिक्षकांच्या बदल्यांवरून वातावरण तापले
By admin | Published: June 17, 2017 12:56 AM2017-06-17T00:56:56+5:302017-06-17T00:56:56+5:30
उच्च न्यायालयात सुनावणी सुरूच : समन्वय समिती आज काढणार धोरणांविरोधात मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामविकास विभागाच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवर राज्यातील वातावरण तापले असून ‘सुगम’ आणि ‘दुर्गम’च्या घोळामध्ये शिक्षक विभागले गेले आहेत. यामध्ये संघटनाही उतरल्या असून, आज, शनिवारी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने या बदलीच्या धोरणाविरोधात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सुगम आणि दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्यांप्रकरणी २७ फेबु्रवारीला आदेश काढण्यात आले होते; परंतु यातील सुगम आणि दुर्गममध्ये गावांची विभागणी करण्याचे निकष चुकीचे असल्याचा आरोप संघटनांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात दुपारी एक वाजता दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ होणार असून, त्यात शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक कृष्णात धनवडे यांनी केले आहे.
विविध बारा संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षक बदलीचा २७ फेब्रुवारीचा अध्यादेश रद्द करून २०१४ च्या अध्यादेशानुसार बदल्या व्हाव्यात, सर्व संवर्गासाठी एकच बदली, सर्व शाळांतील मुलांना गणवेश, जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व शाळांना डिजिटल साहित्य पुरवा, सुगम-दुर्गमपेक्षा सर्वसमावेशक धोरण करा, सर्व शाळांना संगणक शिक्षकांची नेमणूक करा, केंद्रप्रमुखाची पदे शिक्षकांतून पदोन्नतीने भरा, एमएस-सीआयटी प्रशिक्षणाला मुदतवाढ मिळावी, या मागण्या करण्यात येणार आहेत. मोर्चाची या संघटनांनी चांगलीच तयारी केली आहे.
सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष !
या धोरणाविरोधात अनेक शिक्षक न्यायालयात गेले असून, त्यांनी बदलीला स्थगितीही घेतली आहे. दुसरीकडे, दुर्गम भागातून सुगम भागात येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनीही याचिका दाखल केली असून, या बदल्या शासन आदेशाप्रमाणे व्हाव्यात, अशी मागणी केली आहे. शुक्रवारी औरंगाबाद उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. मात्र ती अपुरी झाली. अजूनही सरकारी वकिलांचे म्हणणे बाकी असून, सोमवारी (दि. १९) ही सुनावणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
विशेष संवर्ग भाग १ ची
बदली प्रक्रिया सुरू
दरम्यान, शुक्रवारी ग्रामविकास विभागाने विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. आज, शनिवारी १७ जून ते २१ जूनपर्यंत संबंधित शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून बदलीसाठीचे आॅनलाईन अर्ज भरावेत, असे परिपत्रक काढले आहे. या वर्गामध्ये ५३ वर्षे पूर्ण केलेले शिक्षक, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, अविवाहिता अशा सर्वांचा समावेश होतो.
शाळा सुरू झाल्यानंतर बदल्या होणार का?
एकीकडे गुरुवार (दि. १५) पासून शाळा सुरू झाल्या आहेत. जल्लोषामध्ये विद्यार्थी शाळेत आणले गेले; परंतु शिक्षक मात्र तणावात आहेत. शहरांजवळ राहणारे शिक्षक बदल्या होऊ नयेत म्हणून आणि दुर्गममध्ये राहणारे शिक्षक बदल्या व्हाव्यात या मताचे असल्याने आता शासन शाळा सुरू झाल्यानंतर निर्णय घेणार की यंदा बदल्याच रद्द करणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘दुर्गमवाले’ही देणार निवेदन
एकीकडे समन्वय समितीचा आज, शनिवारी मोर्चा असताना दुसरीकडे दुर्गम गावे शिक्षक संघाच्या वतीनेही या मोर्चाआधी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शासन आदेशाप्रमाणे बदल्या व्हाव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे.
२४५ शिक्षक जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी इच्छुक
जिल्ह्यातील २४५ शिक्षक कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांनी आधीच आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जांची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून छाननी करण्यात येतील. यानंतर आठ दिवसांत याबाबत निर्णय होऊन या सर्वांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात येणार आहेत.