जिल्हा परिषदेत खळबळ : बदल्यांतील ‘ढपल्या’वरून वातावरण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:50 AM2020-02-08T00:50:39+5:302020-02-08T00:52:56+5:30
प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्यावर दबाव टाकून गुरुवारी (दि. ६) रात्री १० वाजता १४ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशांवर सह्या घेतल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. दरम्यान
कोल्हापूर : ‘जिल्हा परिषदेच्याशिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणीही ‘ढपला’ पाडलेला नाही. ज्यांनी कुणी तसे केले असेल तर त्याच्या नावासह छापा,’ असे सांगत अध्यक्ष बजरंग पाटील यांनी आपली भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली. मात्र, या सर्व प्रकाराबाबत चौकशी समिती नेमण्याची मागणी भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी केली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्यावर दबाव टाकून गुरुवारी (दि. ६) रात्री १० वाजता १४ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशांवर सह्या घेतल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. दरम्यान, या सर्व बदल्यांबाबत खुद्द शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनाच काही कल्पना नसल्याने त्यांनीही उबाळे यांना सुनावले आणि उबाळे यांनीही ‘येथे खूपच दबावाखाली काम करावे लागते,’ असे स्पष्ट केल्याने वातावरण अधिकच तापले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये ‘अशा पद्धतीने आरोप होतोच कसा?’ असा सवाल उपस्थित करीत ‘तातडीने खुलासा करावा,’ अशी मागणी केली. यावेळी शिक्षण सभापती यादव यांनीही याबाबत मलाच कशी माहिती दिली नाही, अशी विचारणा केल्याचेही कळते. यानंतर तातडीने अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या कार्यालयाकडून निरोप दिले आणि पत्रकार बैठक घेण्यात आली.
बजरंग पाटील म्हणाले, माणूस आहे म्हटले की चूक होणार; परंतु केवळ आरोप करू नका. आम्ही नवीन आहोत. ज्याने कुणी तसे केले असेल आणि तुमच्याकडे पुरावा असेल, तर त्याचे नाव छापा.
उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, बदल्यांमध्ये अन्याय झाला असेल, बदल्या नियमांत असतील तर त्या कराव्याच लागतील. कामाच्या ताणतणावामुळे शिक्षणाधिकारी अस्वस्थ असतील; पण आम्ही कुणीही दबाव टाकलेला नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सुनावणी घेतल्यानंतर या बदल्या झालेल्या आहेत.
शिक्षण सभापती प्रवीण यादव म्हणाले, गुरुवारी त्या बदल्यांबाबत त्या कराच, असा आम्ही कुणीही आग्रह धरलेला नाही. फक्त एकमेकांचा सन्मान राखून काम होण्याची गरज आहे. पक्षप्रतोद उमेश आपटे म्हणाले, शिक्षण विभागाच्या कामाचा व्याप मोठा आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बसूनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करावे लागते.
अधिका-यांना तणाव असतोच. यावेळी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, राजेश पाटील, शशिकांत खोत यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपस्थित होत्या.
नेत्यांनी फोन करून सुनावले
वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सुनावल्याचे सांगण्यात आले. ‘जर तुम्ही यात दोषी नाही तर पत्रकार परिषद घेऊन तसे स्पष्ट करा,’ असेही या नेत्यांनी सांगितले. त्यामुळेच अध्यक्ष पाटील यांनी तातडीने पत्रकार बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली.
मग, बदल्यांना पावणेदोन
महिने का लागले ?
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी १० डिसेंबर २०१९ रोजी सुनावणी घेतल्यानंतरच्या बदल्यांचे हे आदेश काढले आहेत. मग, हे बदल्यांचे आदेश देण्यासाठी एक महिना २४ दिवस का लागले? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, परीक्षा तोंडावर असताना या शिक्षकांच्या तातडीने बदल्यांची गरज होती का? अशीही विचारणा होत आहे.
विभागीय आयुक्तांचे अधिकार कारभाऱ्यांना दिलेत काय ?
आम्ही शिक्षकांच्या बदल्यांबाबत अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर विभागीय आयुक्तांची परवानगी घेण्याची गरज असल्याचे ते सांगत होते. मग, आता विभागीय आयुक्तांचे अधिकार कारभाºयांना दिलेत काय? अशी विचारणा भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. शिक्षण विभागातील बदल्या आणि खरेदीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सर्वपक्षीय चौकशी समिती नेमण्याची मागणीही भोजे यांनी केली.