राजेंद्रनगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Published: March 11, 2016 01:07 AM2016-03-11T01:07:19+5:302016-03-11T01:08:19+5:30

संशयिताचा शोध सुरू : अपहरण करून केले कृत्य

Atrocities against minor girls in Rajendranagar slum | राजेंद्रनगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

राजेंद्रनगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next

 कोल्हापूर : साफसफाईचे काम देतो, असा बहाणा करून राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि. ९) रात्री मोरेवाडी-कंदलगाव चित्रनगरीजवळील माळरानावर घडली. याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने राजारामपुरी पोलिसांत गुरुवारी दिली.
या प्रकरणी अज्ञाताविरोधात अपहरण, बलात्कार व धमकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला असून, संशयिताचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे हा अज्ञात इसम साफसफाईचे काम देतो, असे सांगून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून फिरत होता त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीची आई, ती मुलगी व तिचा नातेवाईक असे तिघेजण दारात थांबले होते. तो अज्ञात इसम त्यांच्याजवळ आला त्याने ‘साफसफाईच्या कामाला तासाला तीनशे रुपये देतो’ असे सांगितले. त्यावर या तिघांनी याला होकार दिला. त्या अज्ञाताने अल्पवयीन मुलीला व तिच्या एका नातेवाईकाला या दोघांना दुचाकीवरून सोडून येतो, असे तिच्या आईला सांगून तो अज्ञात तेथून निघून गेला.
बऱ्याचवेळ तो अज्ञात आला नसल्याने अखेर तिच्या आईने हा प्रकार राजेंद्रनगर झोपडपट्टीतील नागरिकांना सांगितला. त्यानंतर तिची आई, अन्य नातेवाईक आणि नागरिक या परिसरात दोघांचा शोधाशोध करू लागले व ते राजारामपुरी पोलिस ठाण्यात आले.
त्यांनी हा प्रकार पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या कानावर घातला. तत्काळ पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे, सहाय्यक फौजदार राजू वरक यांच्यासह पोलिसांनी राजेंद्रनगर, मोरेवाडीसह कंदलगांव, चित्रनगरी पिंजून काढत असताना रात्री ती अल्पवयीन मुलगी आर. के. नगर येथून राजेंद्रनगरकडे रडत-रडत चालत येत असल्याचे दिसले. त्यानंतर तिला पोलिस ठाण्यात आणले.
पोलिसांनी तिच्या आईला फोनवरून मुलगी सापडली असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले.
पोलिस ठाण्यात या अल्पवयीन मुलीने ‘पहिल्यांदा त्या अनोळखी इसमाने राजेंद्रनगर येथूनच जवळ असलेल्या एका इमारतीजवळ दोघांना आणले. या इमारतीची साफसफाई करायची आहे, असे सांगून याच इमारतीमधील एका महिलेकडून साफसफाई करण्यासाठी खराटा मागून आणून मला दिला. त्यानंतर पुन्हा फरशी साफ करायची आहे सांगून फिनेल आणायचे आहे, असे सांगून मला दुचाकीवरून तेथून नेले. चित्रनगरी परिसरातील एका माळरानावर ‘माझ्या अंगाशी झोंबाझोंबी करून अत्याचार केला, असे पोलिसांना व आईला सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी बुधवारी रात्री सीपीआरमध्ये आणले. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे करत आहेत.


खाकी रंगाची टोपी अन् विनानंबर प्लेट दुचाकी...
त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या अज्ञाताचे वय अंदाजे ४२ ते ४५ च्या दरम्यान आहे. त्याने डोक्यावर खाकी रंगाची गोल टोपी परिधान केली होती. उंची पाच फूट पाच इंच असून, त्याच्याकडे असलेल्या दुचाकीला नंबर नसल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Atrocities against minor girls in Rajendranagar slum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.