संतापजनक; सख्ख्या लहान बहिणीवरच करत होता अत्याचार, नराधमास वीस वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:58 PM2021-11-25T17:58:34+5:302021-11-25T18:00:54+5:30
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील सख्ख्या भावास बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) जिल्हा व सत्र ...
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील सख्ख्या भावास बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.
खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपीची सख्खी लहान बहीण आहे. ते राजारामपुरी परिसरात राहत असताना तसेच डिसेंबर २०१७ मध्ये हे सर्व कुटुंबासह पाहुण्यांच्या गावी गेले होते. त्याने रात्रीच्या वेळी तसेच इतर ठिकाणी वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिल्याने ही बाब उघडकीस आली. पीडितेच्या आईने राजारामपुरी पोलिसांत तक्रार दिली, त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल झाला. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
पीडिता व फिर्यादी फितूर
खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासले. पीडिता व फिर्यादी या फितूर झाल्या. तरीही डी.एन.ए. रिपोर्ट, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी व पुरावे महत्त्वपूर्ण ठरले, परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य मानून व सरकारी वकील अमृता पाटोळे यांचा युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालयातील सादर केलेले दाखले ग्राह्य मानून प्रस्तुत प्रकरणी न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पो. हे. कॉ. अशोक शिंगे, सहायक फौजदार शाम बुचडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.