हल्ल्यापूर्वी विचारले, ‘पानसरे तुम्हीच का..?’

By admin | Published: February 18, 2015 01:33 AM2015-02-18T01:33:50+5:302015-02-18T01:33:50+5:30

तपासात माहिती : पंचविशीतील तरुण असल्याचा संशय

Before the attack, asked, 'why do you have pansare?' | हल्ल्यापूर्वी विचारले, ‘पानसरे तुम्हीच का..?’

हल्ल्यापूर्वी विचारले, ‘पानसरे तुम्हीच का..?’

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी दोघा हल्लेखोरांनी मोटारसायकलीवरून येऊन ‘पानसरे तुम्हीच का..?’ असे थेट पानसरे अण्णांनाच विचारले होते, अशी माहिती तपासात स्पष्ट होत आहे. हल्ला करणारे दोन्ही तरुण अंदाजे २५ वयाचे असून, त्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता, असेही चौकशीत निष्पन्न होत आहे.
पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांच्यावर सोमवारी सकाळी ९.२६ मिनिटांनी त्यांच्या सागरमाळ परिसरातील निवासस्थानासमोर हल्लेखोरांनी गोळ््या झाडून प्राणघातक हल्ला केला. त्या हल्ल्यातून हे दोघेही वाचले असून उमा पानसरे यांच्या प्रकृतीचा धोका पूर्णत: टळला आहे. त्यामुळे त्यांच्याशी तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दुपारी थोडी विचारपूस केली. त्यांनाही थोड्या गोष्टी आठवतात व काही आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या देत असलेल्या माहितीत काही बाबतीत फरक दिसत असल्याचे तपासात पुढे आले.
हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर मोटारसायकल लावून त्या परिसरात थांबल्याचे पानसरे दापत्याने पाहिले होते. हल्ला करण्यापूर्वी ते पुढे आले व त्यांनी पानसरे तुम्हीच का..? असे विचारले. त्यानंतर या दोघांनी ‘हो’ म्हणून सांगितल्यावर काही क्षणांनी त्यांनी हा हल्ला केला. याचा अर्थ त्यांना नेमके पानसरे कोण..? हे माहीत नव्हते का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातून त्या मारेकऱ्यांचा कुणीतरी वापर करून घेतला असण्याची व ते दोघेही अन्य शहरांतील असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हल्ला झाला तेव्हा पानसरे हे बनियन व लुंगीवर होते त्यामुळेही हल्लेखोरांना त्यांना ओळखण्यात गफलत झाली असण्याची शक्यता आहे.
सोमवारी हल्ल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी तोंडाला काळा मास्क लावल्याची माहिती पुढे आले होती; परंतु मंगळवारच्या तपासातून जी माहिती पुढे आली आहे, त्यानुसार या तरुणांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल लावलेला नव्हता. त्यांच्या अंगात टी शर्ट होता परंतु तो काळा होता की हिरवा हे नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. हल्ला केल्यानंतर ते त्याच गल्लीतून (म्हणजे पानसरे यांच्या बंगल्याच्या दारातील रोडने) मोटारसायकलीवरून पसार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी दिवसभर शास्त्रीनगरपासून इकडे उमा चित्रमंदिर व राजारामपुरीपर्यंत कुठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, सकाळी बँकेत अथवा अन्य कार्यालयांत जात असताना कोणी अशा हल्लेखोरांना मोटारसायकलीवरून सुसाट जाताना पाहिले आहे का याचा शोध घेतला. मोटारसायकलीचा क्रमांक अथवा त्यातील एखादा अंक तरी कुणी पाहिला आहे का याचाही शोध घेत आहेत.
शमशुद्दीन मुश्रीफ यांची भेट
दरम्यान, मंगळवारी राज्याचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी रुग्णालयात येऊन पानसरे दाम्पत्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तपासाबाबत त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याशीही चर्चा केली.

Web Title: Before the attack, asked, 'why do you have pansare?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.