‘आप’च्या कार्यकर्त्यांवर महापौर कार्यालयात हल्ला

By admin | Published: June 19, 2017 05:09 PM2017-06-19T17:09:48+5:302017-06-19T17:09:48+5:30

रस्ते हस्तांतरास विरोध केला म्हणून नगरसेवक, समर्थकांकडून कृत्य

Attacked the AAP workers in Mayor's office | ‘आप’च्या कार्यकर्त्यांवर महापौर कार्यालयात हल्ला

‘आप’च्या कार्यकर्त्यांवर महापौर कार्यालयात हल्ला

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १९ : रस्ते हस्तांतर करण्यास विरोध करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सोमवारी महापौर सकाळी कार्यालयात नगरसेवक व त्यांच्या समर्थकांकडून हल्ला झाला. कार्यकर्त्यांनी महापौर कक्षातील वाद मोबाईलवर रेकॉर्डिंग केला पण त्यांचा मोबाईल काढून घेऊन जबरदस्तीने रेकॉर्डिंग डिलिट करण्यास भाग पाडले. तीन कार्यकर्त्यांना मारहाण झाली. एकाचे कपडे फाटले. या घटनेवेळी महापौर हसिना फरास मात्र कार्यालयात उपस्थित नव्हत्या.

मंगळवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर शहरातून जाणारे चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग असे पाच रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचा सदस्य ठराव मंजुरीकरीता ठेवण्यात आला आहे. आम आदमी पक्षाने अशा हस्तांतरास विरोध केला असून तसे निवेदन यापूर्वी महापौर हसिना फरास यांना देण्यात आले होते. त्यावेळी महापौरांना असा ठराव करणार नाही, अशी ग्वाही दिली होती तरीही ठराव दाखल झाल्यामुळे महापौरांना विरोधाची आठवून करून देण्यासाठी ‘आप’चे दहा-बारा कार्यकर्ते सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या कार्यालयात गेले होते.

‘आप’चे कार्यकर्ते कार्यालयात गेले त्यावेळी महापौर हसीना फरास तेथे नव्हत्या. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा कार्यालयात यायला अर्धा तास लागेल, तोपर्यंत कार्यालयात बसा, असा निरोप त्यांनी दिला म्हणून कार्यकर्ते त्यांच्याच कार्यालयात बसले. काही वेळात महापौरांचे सुपूत्र माजी नगरसेवक आदिल फरास तेथे आले. त्यावेळी फरास यांनी कार्यकर्त्यांना का आलात, म्हणून विचारणा केली. ‘आप’चे कार्यकर्ते संदीप देसाई यांनी एकदमच ‘तुम्ही कोण?’असा सवाल केला. त्यावेळी ‘मी महापौरांचा प्रतिनिधी आहे तुमचे काय म्हणणे आहे ते सांगा’ अशी विनंती फरास यांनी केली. त्यानंतर पुन्हा देसाई यांनी ‘तुम्हाला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केल्याचे पत्र दाखवा’अशी अपमानास्पद भाषा वापरली.

चर्चा वाढतेय हे पाहून नारायण पोवार यांनी हस्तक्षेप करत ‘आम्ही रस्ते हस्तांतर करण्याला विरोध केला आहे, तरीही ठराव आणला असल्यामुळे महापौरांना हा ठराव मंजूर करू नका म्हणून सांगायला आलो’ असल्याचे सांगितले. हा ठराव दाखल करून घेताना महापौरांचाही यात सहभाग असल्याची आम्हाला शंका येत आहे, असा संदीप देसाई यांनी आरोप केला. त्यावेळी आदिल फरास संतप्त झाले. बिनबुडाचे आरोप करू नका वस्तुस्थिती आधी माहीत करून घ्या, मग बोला. शनिवारी नगरविकास कार्यालयात ठराव दाखल झालेला आहे. त्याची महापौरांना कल्पना नाही, असा खुलासा केला. तरीही ‘आप’चे कार्यकर्ते नगरसेवकांना उद्देशून एकेरीवरच बोलत राहिले. त्यावेळी आदिल फरास यांनी ‘आधी महापालिकेवर निवडून या मग बोला. आम्हाला निवडून येताना घाम गाळून यायला लागते’, अशा शब्दांत सुनावले. त्यावेळी ‘पैसे वाटून नगरसेवक निवडून येतात याची आम्हाला जाणीव आहे’, असे संदीप देसाई म्हणताच शाब्दिक वाद अधिकच चिघळला आणि प्रकरण हातघाईवर गेले.

झोंबाझोंबी अन् मारहाणही

‘आप’चे कार्यकर्ते आणि फरास यांच्यातील वाद वाढल्यामुळे अन्य पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी महापालिकेतच असलेले उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक संभाजी जाधव, सचिन पाटील, संजय मोहिते, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, अश्पाक आजरेकर आदी महापौर कार्यालयात आले. त्यातून वाद मिटण्याऐवजी तो एकमेकांना ‘अरे-तुरे’ म्हणण्यापर्यंत गेला. आधी नारायण पोवार यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. एकाने महापौर कक्षाचा दरवाजा बंद केला. आणि कार्यकर्त्यांशी झोंबाझोंबी सुरू झाली. त्यामध्ये संदीप देसाई यांच्या शर्टचे बटण तुटले. उत्तम पाटील नावाच्या कार्यकर्त्याने केलेले रेकॉर्डिंग सक्तीने मोबाईल काढून घेऊन डिलीट केले. त्यास दोन कानशिलात लगावल्या. सद्दाम देसाई यालाही मारहाण करण्यात आली. अखेर संभाजी जाधव, संजय मोहिते यांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची सुटका केली.

घटनेमुळे कार्यकर्ते बिथरले

महापौरांना भेटून निवेदन द्यायला गेलेल्या कार्यकर्त्यांवर असा अनपेक्षित हल्ला झाल्याने ते घाबरले. महापौर कार्यालयातून ते थेट आयुक्त अभिजित चौधरी यांना भेटायला गेले पण तेही भेटले नाहीत. नारायण पोवार, जयवंत पोवार, संदीप देसाई, नीलेश रेडेकर, आप्पासो कोकीतकर, उत्तम पाटील, विश्वनाथ शेट्टी, आनंदराव वाणेर, एस्तेर कांबळे यांनी पत्रकारांना घडल्या प्रकाराची माहिती सांगितली. त्यावेळी सर्वजण घाबरलेले होते. कोणी-कोणी मारहाण केली, अशी विचारणा केली असता ‘नगरसेवकांचे समर्थक होते’ एवढेच त्यांनी सांगितले. कोणाची नावे घेण्याचे टाळले.

महापौर कार्यालयात पहिलाच प्रकार

एखाद्या प्रश्नावर निवेदन द्यायला गेलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अशाप्रकारे हल्ला होण्याची महापौर कार्यालयातील ही पहिलीच वेळ आहे. महापौर फरास कार्यालयात नसताना ही घटना घडली. येणाऱ्या कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारणे आणि त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करून न्याय देण्याच्या महापौरांच्या परंपरेलाच या घटनेमुळे गालबोट लागले.

Web Title: Attacked the AAP workers in Mayor's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.