Kolhapur: अज्ञाताकडून हल्ला, डोक्यात घुसलेल्या कोयत्यासह जखमी रुग्णालयात; प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 11:45 AM2024-07-09T11:45:57+5:302024-07-09T11:48:45+5:30
हल्लेखोर पळाले; जखमीची प्रकृती चिंताजनक
कोल्हापूर : करनूर (ता. कागल) येथे गुलाब बाबालाल शेख (वय ६०, रा. करनूर) यांच्यावर सोमवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अज्ञाताने कोयत्याने हल्ला केला. यावेळी डोक्यात घुसलेल्या कोयत्यासह शेख यांना बेशुद्धावस्थेत नातेवाईकांनी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून कोयता काढला असून, शेख यांची प्रकृती चिंताजनक आहे.
करनूर येथील गुलाब शेख हे शेतकरी आहेत. सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास गावात स्मशानभूमीजवळ ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यात पडलेले आढळले. काही ग्रामस्थांनी याची माहिती शेख यांच्या कुुटुंबीयांना दिली. यानंतर तातडीने शेख यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचला. शेख यांच्या डोक्यात धारदार कोयता अडकला होता. दोन्ही हातांवर कोयत्याने वार झाले होते.
खासगी वाहनातून त्यांना कागल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सीपीआरमध्ये पोहोचताच डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करून डोक्यात अडकलेला कोयता काढला. त्यानंतर शेख यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
हल्लेखोर, कारण अस्पष्ट
शेख हे पत्नी, दोन मुली आणि मुलगा यांच्यासह करनूर येथे राहतात. त्यांच्यावर कोणी आणि का हल्ला केला? याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. मुलासह काही नातेवाईक सीपीआरमध्ये उपस्थित होते.