‘दिलबहार’च्या कार्यकर्त्यांवर हल्ला

By admin | Published: May 17, 2016 01:12 AM2016-05-17T01:12:19+5:302016-05-17T01:14:15+5:30

दुचाकींची तोडफोड : उमा प्ले ग्रुपच्या संतप्त कार्यकर्त्यांचे कृत्य; नगरसेवकपदाच्या स्थगितेचे पडसाद

Attackers of 'Dilbahar' activists | ‘दिलबहार’च्या कार्यकर्त्यांवर हल्ला

‘दिलबहार’च्या कार्यकर्त्यांवर हल्ला

Next

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील यांच्यावरील नगरसेवकपद रद्दच्या कारवाईला स्थगिती मिळाल्याने दिलबहार तालमीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी भागातून रॅली काढली होती. यावेळी त्यांनी विरोधी गटातील उमा प्ले ग्रुपच्या एका कार्यकर्त्यांस बेदम मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद रात्री साडेदहाच्या सुमारास उमटले. जवाहरनगर येथील मित्राच्या लग्नाच्या वरातीला आलेल्या दिलबहार तालमीच्या सहा कार्यकर्त्यांवर उमा प्लेच्या तीस ते चाळीस कार्यकर्त्यांनी हल्ला चढवित चार दुचाकींची तोडफोड केली.
महापौर अश्विनी रामाणे, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, संदीप नेजदार, दीपा मगदूम, सचिन पाटील, नीलेश देसाई , संतोष गायकवाड अशा सात जणांचे जातीचे दाखले विविध कारणांनी अवैध ठरविले होते. महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. दरम्यान, महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. त्याच्या आनंदोत्सवात दुपारी चारच्या सुमारास नगरसेवक सचिन पाटील यांच्या दिलबहार तालमीच्या कार्यकर्त्यांनी भागातून रॅली काढली. यावेळी उमा प्ले ग्रुपच्या कार्यकर्त्यांसोबत वादावादी होऊन त्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला.
दरम्यान, दिलबहार तालमीचा कार्यकर्ता साईराम जाधव हा काही मित्रांसोबत जवाहरनगर येथील मित्राच्या लग्नाच्या वरातीसाठी जाणार असल्याची कुणकुण उमा प्ले ग्रुपच्या कार्यकर्त्यांना लागली. तीस ते चाळीस कार्यकर्ते आयसोलेशन रुग्णालयासमोरील इमारतीच्या आडोशाला पाळत ठेवून बसले. ‘दिलबहार’चा साईरामसह सहा कार्यकर्ते चार दुचाकींवरून आयसोलेशन रुग्णालयासमोर आले. रस्त्याकडेला दुचाकी पार्किंग करून चालत ते जवाहरनगरमधील लग्नाच्या वरातीकडे निघाले. यावेळी दबा धरून बसलेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत त्यांच्यावर चाल केली. भीतीने ‘दिलबहार’चे कार्यकर्ते दुचाकी जागेवर टाकून हॉकी स्टेडियमच्या दिशेने पळून गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी दोन स्प्लेंडर (नं एमएच ०९-डीजी-०८८०,एमएच ०९-एजी-९०००), मोपेड (एमएच ०९-बीडब्ल्यू ४११४) व पल्सर (एमएच ०९-सीक्यू- ६९८६) अशा चार दुचाकींचा चक्काचूर केला. दुचाकींवर भले मोठे दगड घालून रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकून ते निघून गेले. अचानक गोंधळ उडाल्याने लग्नाची वरात बंद करून डॉल्बीही बंद करण्यात आला. राजारामपुरी व जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्ल्याची माहिती घेतली. घटनास्थळी नगरसेवक सचिन पाटील, साईराम जाधव, दिलबहार तालीम व उमा प्ले ग्रुप आदींच्या नावाची पोलिस चर्चा करत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी उमा टॉकीज चौकात बंदोबस्त लावला. राजारामपुरीचे पोलिस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दुचाकी पोलिस ठाण्यासमोर आणून ठेवल्या. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी संशयितांचा शोध सुरू होता. (प्रतिनिधी)

Web Title: Attackers of 'Dilbahar' activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.