Kolhapur News: डोक्यात दगड घालून खून, कळंबा कारागृहातील हल्लेखोर कैद्याची येरवड्यात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:42 PM2023-02-07T12:42:08+5:302023-02-07T12:42:32+5:30
मृत कैद्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी इन कॅमेरा करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला
कोल्हापूर : कळंबा कारागृहात झोपेत असलेला कैदी सतपालसिंग जोगिंदरसिंग कोठाडा (वय ३९, रा. सायन, मुंबई) याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी कारागृह प्रशासनाने संशयित आरोपी गणेश लक्ष्मण गायकवाड (वय २९, रा. वाशी, मुंबई) याची सोमवारी (दि. ६) पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केली. कारागृहात घडलेल्या खुनाच्या घटनेबद्दल ड्यूटीवरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात रविवारी (दि. ५) पहाटे कैद्यानेच एका कैदी मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्यामुळे खळबळ उडाली होती. चेष्टामस्करी केल्याच्या रागातून जीवघेणा हल्ला करणारा कैदी गणेश गायकवाड याची कारागृह प्रशासनाने तातडीने सोमवारी पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केली. तसेच खुनाच्या घटनेची स्वतंत्र समितीकडून चौकशी करण्यात आली. चार सदस्यीय समितीने ड्यूटीवरील चार रक्षक, दोन वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि १० कैद्यांची चौकशी करून २७ पानांचा अहवाल कारागृह अधीक्षक प्रभारी पांडुरंग भुसारी यांच्याकडे सोपवला.
मृतदेह नातेवाइकांकडे सोपवला
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, मृत कैदी सतपालसिंग कोठाडा याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी सीपीआरमध्ये इन कॅमेरा करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली.
शिस्तीसाठी प्रयत्न
कळंबा कारागृहातील बिघडलेली शिस्त आणि कैद्यांकडून होत असलेल्या गंभीर गुन्ह्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. कैद्यांवर वचक राहावा, त्यांच्यातील गटबाजी संपावी आणि हिंसक वृत्ती कमी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कारागृह अधीक्षक प्रभारी भुसारी यांनी दिली.