पासपोर्ट कार्यालय होण्यासाठी प्रयत्न : मुळे
By admin | Published: April 2, 2016 12:46 AM2016-04-02T00:46:42+5:302016-04-02T00:47:30+5:30
कोल्हापुरात शिबिर : पुणे विभागीय कार्यालयातर्फे ‘पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रम
कोल्हापूर : कोल्हापुरात यापूर्वी सुरू असलेले पासपोर्ट कार्यालय पूर्ववत सुरू करावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. त्याची नोंद आपण घेतली असून, आपल्या पातळीवर यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कौन्सुलर पासपोर्ट व्हिसा विभागाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकारांशी वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी उपस्थित होते.
मुळे म्हणाले, प्रशासन लोकाभिमुख झाले असून, ही प्रक्रिया आणखी सुलभ होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडच्या काळात विदेश मंत्रालय आणि सर्वसामान्य माणसांचा रोज संपर्क होऊ लागला आहे. त्यामुळे पासपोर्टलाही अधिक महत्त्व आले आहे. हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘आयईसी’च्या माध्यमातून गावपातळीवर जाऊन जास्तीत जास्त लोकांना पासपोर्ट देण्याचा प्रयत्न आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात अव्वल असला तरी पासपोर्ट वितरणात अजूनही मागे असल्याचे चित्र आहे. त्यासाठी पासपोर्ट केंद्रांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा.
लोकांना लवकरात लवकर पासपोर्ट मिळावा, यासाठी ‘पासपोर्ट आपल्या दारी’ हा उपक्रम पुणे विभागीय कार्यालयामार्फत राबविला जात आहे. कोल्हापुरात सुरू असलेले शिबिर त्याचाच एक भाग आहे. देशातील ६८० जिल्ह्यात पासपोर्टसाठी आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पोलिस पडताळणीची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड ही तीन कागदपत्रे असल्यास पासपोर्ट मिळण्यास अडचण नाही. नंतर पडताळणी चालू शकते. देशाच्या आर्थिक विकासाला पासपोर्टचाही मोठा हातभार आहे.
कोल्हापुरातील तिसरे शिबिर
पासपोर्टसंदर्भात २०१३ व २०१५ मध्ये कोल्हापुरात शिबिर घेण्यात आले होते. आताचे हे तिसरे शिबिर आहे. आणखी दोन महिन्यांनी पाच दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पासपोर्ट हे आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम आहे. पासपोर्ट संदर्भातील अॅप आहे. तो पोलिसांनी स्वीकारल्यास पडताळणी लवकर होण्यास मदत होईल.