दिव्यांगांच्या विकासासाठी प्रयत्नशील
By admin | Published: April 16, 2017 12:51 AM2017-04-16T00:51:30+5:302017-04-16T00:51:30+5:30
संभाजीराजे : स्वयंम् शाळेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन; वास्तू उभारणीत सहकार्य केलेल्यांचा सत्कार
कोल्हापूर : दिव्यांग मुलांनी स्वावलंबी बनावे यासाठी स्वयंम् शाळेने केलेले कार्य प्रेरणादायी राहील. संस्थेच्या नियोजित उपक्रमास व दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी दिली.
न्यायसंकुलामागे इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे उभारण्यात आलेल्या स्वयंम् शाळेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संयोगिताराजे छत्रपती, व्हाईस चेअरमन व्ही. बी. पाटील, चेअरमन राजू दोशी, साधना घाटगे, शोभा तावडे उपस्थित होत्या. संभाजीराजे म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम ही राबविण्यात येणार आहे. मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांगांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी स्वतंत्र कृती आराखडा राबवावा, अशी मी केंद्र व राज्य शासनाकडे मागणी करणार आहे. वयाच्या १८ व्या वर्षानंतर विशेष मुलांची स्वतंत्र सोय करणे गरजेचे आहे. आपल्या मागणीनुसार शाळेच्या नियोजित इमारतीचा आराखडा पूर्ण करण्यासाठी मी मदत करीन.
संयोगिताराजे यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले व या परिवारातील एक सदस्य म्हणून यापुढे कार्यरत राहीन, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात राजू दोशी म्हणाले, १९९० साली पाच-सहा मुलांनिशी सुरू झालेल्या या शाळेत आता १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक एकर जागेत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी मोठा हॉल, स्विमिंग पूल, बगीचा, हॉस्टेल, डे केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी चार कोटींचा निधी लागणार आहे.
अमरदीप पाटील म्हणाले, मानवतावादी कार्य करणारी संघटना म्हणून इंडियन रेडक्रॉस संस्थेचा नावलौकिक आहे. देशातील ३५ राज्यांत आणि ७०० हून अधिक जिल्ह्यांत संस्थेच्या शाखा असून कोल्हापुरातील स्वयंम् शाळेत सेरेब्रल पाल्सीसह सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
यावेळी वास्तू उभारणीसाठी सहकार्य केलेले उद्योगपती सचिन मेनन, किरण पाटील, शैलेश देशपांडे, सुमित्र जाधव, पुरुषोत्तम मंत्री, मुबारक शेख, राजशेखर संबर्गी, भरत जाधव, अरुणबाबू गोयंका, गोविंद गुंदेशा, हंजारीमल राठोड, विष्णू बन्सल, राजू दोशी, वाय ए. पाटील, संदीप पोरे, हरीश सेवलाणी, दीप संघवी, जितुभाई शहा यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला. शोभा तावडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अमरदीप पाटील व अॅड. सुलक्ष्मी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
११ लाखांची देणगी
यावेळी उद्योगपती प्रकाश राठोड व महेंद्र राठोड यांनी स्वयंम् शाळेच्या उभारणीसाठी ११ लाख रुपयांची देणगी दिली.
युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते सदर रकमेचा धनादेश शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.