शाळकरी मुलीला पळविण्याचा प्रयत्न, संभाजीनगर परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:18 PM2019-03-08T12:18:42+5:302019-03-08T12:20:16+5:30
कोल्हापूर : संभाजीनगर परिसर येथील आठ वर्षांच्या शाळकरी मुलीला बुधवारी (दि. ६) लॉलीपॉपदाखवून पळविण्याचा प्रयत्न फसला. तोंडाला रुमाल बांधून ...
कोल्हापूर : संभाजीनगर परिसर येथील आठ वर्षांच्या शाळकरी मुलीला बुधवारी (दि. ६) लॉलीपॉपदाखवून पळविण्याचा प्रयत्न फसला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञाताचा संशय मुलीला आल्याने तिने घरातून पळ काढला.
हा प्रकार मुलीच्या आई-वडिलांना घरमालकांनी रात्री सांगितला. त्यानंतर त्यांनी गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संभाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा शोध सुरू केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की संभाजीनगर नाका येथे एक दाम्पत्य भाड्याने राहते. दोघेही खासगी नोकरी करतात. त्यांची मुलगी एका विद्यालयात दुसरीच्या वर्गात शिक्षण घेते. रोज सकाळी शाळा असल्याने ती मुलगी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात येते. त्यांच्या घरापाठीमागे टेरेस आहे. तेथेच त्यांची खोली आहे.
बुधवारी (दि. ६) नेहमीप्रमाणे ती घरी आली. ती घरी एकटीच होती व घराचे दार उघडे होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टेरेसवरून तोंडाला रुमाल बांधून एक अज्ञात तिच्या घरात पोते घेऊन आला. तिला अज्ञाताने लॉलीपॉप दाखविले.
तिला आई-वडिलांनी कोणाकडून चॉकलेट किंवा इतर कोणतेही साहित्य घ्यावयाचे नाही, असे सांगितल्याने तिचा संशय बळावला. ती घरातून पळत, रडत-रडत घराखाली असलेल्या बेकरीत गेली. तिने बेकरीच्या मालकांना हा प्रकार सांगितला. बेकरीवाल्यांनी हा प्रकार त्या मुलीच्या घरमालकांना सांगून मुलीला त्यांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, नागरिकांनी तिच्या घरात जाऊन पाहिले, तर अज्ञात तेथे नसल्याचे निदर्शनास आले. दुपारपासून ती मुलगी रात्री आठ वाजेपर्यंत घरमालकाच्या घरात बसून होती. या मुलीचे आई-वडील रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी आले, तेव्हा घरमालकांनी हा प्रकार त्यांना सांगितला. रात्र झाल्याने गुरुवारी याची माहिती पोलिसांना देण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला.
दरम्यान, गुरुवारी या मुलीचे पालक जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला; त्यामुळे पोलिसांनी संभाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा शोध सुरूकेला आहे.
संशयिताचे वर्णन...
संशयिताने तोंडाला रुमाल बांधला होता. त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ होते, तर त्याने अंगात काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता, असे वर्णन त्या शाळकरी मुलीने सांगितले.